५०० रोबोंमुळे उत्पादनात मोठी वाढ

औरंगाबादचे औद्योगिक क्षेत्र आता ‘रोबो’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवान बनले आहे. ५०० हून अधिक रोबोंमुळे उत्पादनाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे.

शहराच्या औद्योगिकीकरणाची ओळख बजाज ऑटोमुळे जगभर पोहोचली. दिवसाला १ हजार ६०० ऑटो रिक्षा पूर्वी तयार होत होत्या. आता रोबो तंत्रज्ञानामुळे हा आकडा २ हजार ५०० हून अधिक झाला असल्याचा दावा उद्योजक करीत आहेत. काय करत नाही हा रोबो? ऑटो रिक्षांच्या वेगवेगळ्या लोखंडी पत्र्यांना वेल्डिंगने जोडण्यापासून ते रंग देण्यापर्यंतची कामे आता रोबो तंत्रज्ञानामार्फत केली जात आहेत. तंत्रज्ञानामुळे उत्पादनाचा दर्जा उंचावला आहे. अचूक तंत्रज्ञानामुळे औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली चेतना पुण्यापेक्षाही अधिक जाणवत आहे. मात्र, असे असले तरी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात मोठे उद्योजक अजूनही येण्यास इच्छुक नसल्याची स्थिती आहे.

ऋचा इंडस्ट्रीमधून बजाज कंपनीला ऑटो रिक्षाचे सांगाडे बनवून दिले जातात. हे सांगाडे  बनवताना   ‘स्पॉट वेल्डिंग’ करावी लागते. स्पॉट वेल्डिंग करणारे अनेक रोबो आता विविध कंपन्यांमध्ये आहेत. ऋचा कंपनीतील तंत्रज्ञ सांगत होते, पूर्वी ज्या वेगाने आम्ही काम करायचो, तो वेग कायम ठेवणे हे आव्हान असायचे. दिवसाला १ हजार ६०० सांगाडय़ांचे काम होत असे. मात्र, रोबो तंत्रज्ञान आले आणि आता पत्रा जोडण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करण्यासाठी रोबो वापरले जातात. प्रत्येक रोबोला त्याचे काम ठरवून देण्याचा ‘प्रोग्राम’ दिलेला असतो. काळ, काम आणि वेगाचे गणित त्यामुळे पूर्णत: बदललेले आहेत. आता ऑटो रिक्षाच्या उत्पादनाचा वेगही कमालीचा वाढला आहे. जेव्हा उद्योग क्षेत्रात मंदीचे सावट होते, तेव्हा तंत्रज्ञानातील बदल औरंगाबादमधील उद्योजकांनी स्वीकारले आणि आता मोठा बदल दिसू लागला आहे. मराठवाडा ऑटो क्लस्टरचे प्रमुख राम भोगले म्हणाले की, जेथे ऑटो इंडस्ट्री असते, तेथे रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरले जाते. औरंगाबादमध्ये अलीकडे रोबो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादनाचा वेग वाढला आहे.

मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्येही रोबो वापरावा कोठे, कसा याचे प्रशिक्षण दिले जाते. मराठवाडा ऑटो क्लस्टरचे उपव्यवस्थापक राजेंद्र मुदखेडकर म्हणाले, एकच एक काम करण्याने कुशल तंत्रज्ञ माणसाला मानसिक थकवा येतो. त्यामुळे कामाच्या दर्जावर कधी परिणाम झाला आहे, हे कुशल माणसालाही कळत नाही. दुसरी गोष्ट रोबो आल्यापासून मी फार थकलो आहे, असे म्हणण्याचे कारणच उरले नाही. एकदा त्या यंत्राला काम दिले की, तो देईपर्यंत करत राहतो. त्यामुळे अगदी दिवाळीच्या काळातसुद्धा मजूर नाही म्हणून थांबण्याची आवश्यकता भासत नाही. त्याचा एकत्रित सकारात्मक परिणाम उद्योगजगतावर दिसत आहे.

ऑटो रिक्षा तयार होताना सांगाडे, पेट्रोलच्या टाक्या, रिक्षाचे हँडल, चाक असे वेगवेगळे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी बनतात. त्याचा वेग रोबोंमुळे वाढला आहे. १२० सेकंदांमध्ये सांगाडय़ाचे काम जोडले जायचे. आता रोबोमुळे या कामावर लागणारे मनुष्यबळ कमी झाले आहे. मात्र, तंत्रज्ञानातील अचूकतेमुळे उत्पादनाचा वेग आणि दर्जा वधारला आहे. काही ठिकाणी सांगाडे तर काही ठिकाणी ऑटो रिक्षाच्या टपाचा भाग बनवला जातो. या सगळ्या ठिकाणी आता रोबोंची एक रांगच उभी असते. प्रत्येक रोबोचे काम वेगळे असते आणि क्षमताही निरनिराळ्या. या नव्या तंत्रज्ञानामुळे वेल्डिंगमुळे होणारे अपघाताचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. एखादी जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवणे, त्याचबरोबर तयार झालेल्या रिक्षांना रंग देण्याचे कामसुद्धा आता रोबोमार्फत केले जाते. केवळ रिक्षाच नाही तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुटे भागही अशाच पद्धतीने बनवले जातात.

  • सर्वसाधारणपणे जपान आणि जर्मनी या दोन देशांतून यंत्रमानव आणले जातात. मध्यम आकाराच्या यंत्रमानवाची किंमत २० ते २५ लाख रुपयांपर्यंत असते.
  • एखाद्या यंत्रमानवाने कसे काम करावे आणि त्याला कोणती आज्ञावली द्यायची याबाबतचे तंत्रज्ञान भारतातील बहुतांश ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी स्वीकारले आहे.
  • औरंगाबादमध्ये ग्राइंडमास्टर ही कंपनी यंत्रमानावाचे ऑटोमायझेशन करून देते. यंत्रमानवाला काम देण्यापूर्वी पत्रा किंवा लोखंडाला त्याच जागी, त्याच पद्धतीने बसवावे लागते अन्यथा एकतर यंत्रमानव काम करत नाही किंवा केले तरी ते चुकीच्या ठिकाणी होते. त्यामुळे काम देण्यासाठीसुद्धा अचूकता लागते. ऋचा इंडस्ट्रीमध्ये ५० हून अधिक यंत्रमानव सांगाडे बनविण्याचे काम करतात.