रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष समाजातील दीन-दलित, शोषित-पीडितांचा आवाज असून कोणा येडय़ागबाळ्याचा नसून पक्षाची मान्यता काढली असली तरी लोकमान्यता कायम आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षणाचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर रणकंदन माजेल. सत्तेसाठी कधीही गुलामगिरी पत्करणार नाही. तुम्ही कितीही दाबा गळा, फडकत राहील भीमाचा निळा अशा शब्दांत खासदार रामदास आठवले यांनी इशारा दिला. घटक पक्षांच्या सर्वच नेत्यांनी सत्तेत वाटा मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्याची संधी साधली.
बीड येथे पंचशीलनगर भागातील खुल्या मदानावर शनिवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंचा ५८ वा वर्धापनदिनाचा महामेळावा झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार महादेव जानकर, विनायक मेटे, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, रिपाइंचे प्रदेश युवा अध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह रिपाइंचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची गरहजेरी आणि दोन्ही मंत्री शुभेच्छा देऊन अध्र्यातून गेल्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये जाहीरपणे नाराजीचा सूर व्यक्त झाला.
पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महायुतीतील घटक पक्षांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपले प्रयत्न आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वाना सोबत घेऊन मोट बांधली. ती आता आपली जबाबदारी आहे. तर रामदास कदम यांनी आठवले यांनी महायुती केली तेव्हा शिवसेना त्यांच्यासोबत नव्हती, त्यामुळे त्यांच्यात काय करार झाला हे आपल्याला माहीत नाही. मात्र शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आठवले यांना दिल्लीत पाठवण्याचा ठराव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. पण त्याला आठवलेंनी नकार दिल्याचे सांगून एका बाजूला ताई दुसऱ्या बाजूला भाई मग अजूनसुद्धा आठवलेंना लाल दिव्याची गाडी का नाही? असा उपरोधक टोलाही लगावला. आमदार महादेव जानकर म्हणाले, मित्रपक्षांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी पंकजा मुंडे भांडत आहेत. मात्र आता जास्त परीक्षा घेऊ नका. लोक आम्हालाही विचारत आहेत, लग्न लावून द्या असे सूचक विधान करून मंत्रिपदाची आठवण करून दिली. आमदार विनायक मेटे यांनीही शेलक्या शब्दात भाजपचा समाचार घेताना मंत्रिपदासाठी कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही असे सांगत हक्काने मंत्रिपद दिले नाही तर प्रसंगी हिसकावून घेऊ, असा इशारा दिला.