News Flash

रा. स्व. संघाच्या आता ‘ई-शाखा’

संघ दक्ष आता गुगल मीटवर

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

‘ध्वज प्रणाम’ अशी एका स्वयंसेवकाने आज्ञा दिली. गुगल मीट आणि अन्य अ‍ॅपवर जोडल्या गेलेल्या व्यक्तींनी छातीवर आडवा हात ठेवून प्रणाम केला. प्रार्थना म्हटली. सुभाषित झाल्यावर बोधपर कथा सांगण्यात आली. छोटय़ा स्वयंसेवकांच्या शाखेत व्यायामाचे प्रकार सांगण्यात आले आणि ताज्या घडामोडीमवर चर्चादेखील झाल्या. असे सारे ई-शाखांमधून रोज घडते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आता रोज वेगवेगळया अ‍ॅपवर घडतात. देवगिरी प्रांतामध्ये अशा ११० हून अधिक ई-शाखा भरत आहेत. देवगिरी प्रांताचे रा. स्व. संघाचे संघचालक मधुकर जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला.  शहरामध्ये सुरू असणाऱ्या प्रभात आणि सायं शाखांचे एकत्रिकरण होत नव्हते. परिस्थितीमुळे आलेल्या अपरिहार्यतेतून करण्यात आलेले बदल एकमेंकाना जोडून ठेवणारे आहेत. औरंगाबाद शहरात अशा ४० शाखा सुरू असल्याचे जाधव म्हणाले.

करोनाावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर शाखा कशा घ्यायच्या याची चर्चा  सुरू होती. स्वयंसेवकांनी ‘ ई-शाखा’ ही संकल्पना विकसित केली होती. तसेच विदेशातील अनेक स्वयंसेवकही ठरावीक वेळी अशा प्रकारची शाखा घेत होते. औरंगाबादसह मोठय़ा शहरांमध्ये ई-शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये नेहमीचे शाखेतील व्यवहार केले जात असल्याचे सांगण्यात येते. संघ दक्ष आता ‘गुगल’, ‘स्काईप’ सारख्या माध्यमातून होत आहे. दुसरीकडे ज्यांच्याकडे इंटरनेटची क्षमता कमी आहे अशा ठिकाणी दूरध्वनीवरुन हे सगळे पार पाडले जाते. रा. स्व. संघाची प्रार्थनाही म्हटली जाते. बौद्धिक वर्गही अशाच पद्धतीने घेतले जात असल्याचे जाधव म्हणाले.

करोनाच्या काळात मदत कशी करावी, याचेही नियोजन केले जात असल्याचे हरीष कुलकर्णी यांनी सांगितले. अलीकडे ‘कुटुंब शाखा ’ असाही प्रयोग केला जात आहे. घरातील सदस्य एकत्र येऊन प्रार्थना म्हणतात. एक तासाच्या शाखा कालावधीमध्ये तसा कोणताही बदल झालेला नाही. एकमेकांशी जोडून राहणे हे काम संघ शाखेतून होत असते. ते प्रत्यक्षात करता येत नसले  तरी इंटरनेटच्या मदतीने सारे होत आहे, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 12:42 am

Web Title: rss now e branch abn 97
Next Stories
1 …अडचणीत असाल तर मोफत न्या ! मनाची श्रीमंती दाखवणाऱ्या मराठमोळ्या भाजीवाल्याची गोष्ट
2 औरंगाबादला करोनाचा विळखा, रुग्णसंख्या १३२७
3 औरंगाबाद @१३०१; आतापर्यंत करोनामुळे ५० जणांचा मृत्यू
Just Now!
X