येथील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचारी महासंघातर्फे बुधवारी काळय़ा फिती लावून काम केले. तर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठय़ा संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

आंदोलनकर्त्यां राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करून कायम करणे आणि समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन आदी त्यांच्या मागण्या आहेत. आंदोलनात १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमध्ये कार्यरत कर्मचारी अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की नियमित कर्मचाऱ्याप्रमाणेच काम करूनही अत्यंत कमी मानधन व इतर सुविधांचा अभाव, अपमानास्पद वागणूक, ११ महिन्यांनी प्रतिनियुक्तीसाठी पिळवणूक होत आहे. कंत्राटी सेवा जणू गुलामगिरीचे नवीन स्वरूप असल्याचे वाटू लागले आहे, असेही ते म्हणाले. या अनुषंगाने दिलेल्या निवेदनावरविशाल ठोंबरे, संघटनेचे सचिव संजय भोकरे यांच्या सहय़ा आहेत.