दहिफळ भोंगाणे गावातील प्रयोग

औरंगाबाद :  महिला पालकांमध्ये जागृती केल्यानंतर प्राथमिक शाळेतील प्रत्येक मुलाला टॅब घेण्यासाठी गावातून प्रत्येक पालकाने प्रत्येकी सहा हजार रुपये जमा केले आणि जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोंगाणे या शाळेत टॅब आले. प्रत्येक टॅबला इंटरनेटचा खर्च कोण करणार? त्यावरही दोन ‘डोंगल’चा पर्याय शोधण्यात आला आणि कोविड काळातही ही शाळा रोज भरली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पेंटू मैसनवाड या शिक्षकाने केलेले प्रयत्न आता आवर्जून सांगितले जात आहेत.

दहिफळ भोंगाणे हे सहाशे लोकसंख्या असणारे छोटे गाव. चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा. शाळेचा पटही तसा कमीच, म्हणजे फक्त बावीस. दोन शिक्षक. हे शिक्षक चांगले काम  करतात. पेंटू मैसनवाड यांनी मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी गेल्या वर्षी प्रयोग हाती घेतले होते. फेब्रुवारीमध्ये म्हणजे करोना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मुलाला टॅब मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत करोना आला नव्हता. पण आला तर या भीतीपोटी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा डिजिटल करण्याकडे कल होताच. गावातील महिला पालकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात आपल्या मुलींनी आयुष्यभर खुरपणीचेच काम करावे असे कोणाला वाटते?, शेतीत राबण्याऐवजी आपल्या मुलाने अधिक पुढे जावे असे वाटते की नाही, असे काही भावनिक प्रश्न विचारले. त्याचा पालकांच्या मनावर परिणाम झाला आणि पाच दिवसांत प्रत्येकाने सहा हजार रुपये गुरुजींकडे जमा केले. त्यातून टॅब आले. पण गावात ‘रेंज’ नव्हती. मग दोन ‘डोंगल’ घेऊन ती गावात बसविण्यात आली. इंटरनेटच्या आधारे एक तासाची शाळा कोविड काळातही सुरू राहिली. या शाळेचा ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. पहिली ते चौथीपर्यंतची मुले पाढे, उजळणी आणि गणिती खेळाचे अ‍ॅप डाउनलोड करतात. कोणी इंटरनेटचा दुरुपयोग करणार नाही. मुलांकडून चुकीने मनोरंजनाचे, सिनेमाची संकेतस्थळे उघडणार नाहीत, यावर गुरुजी लक्ष ठेवून असतात. मसनवाड सांगतात, ‘या उपक्रमाचे सारे श्रेय गावकऱ्यांचे आहे. कारण आपल्या मुलांना टॅबवर शिक्षण मिळायला हवे असे वाटण्याची प्रक्रिया अवघड असते. ती पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या वर्षी शिकवू शकलो. आता दुसरीतील मुले चांगले वाचन करू लागली आहेत. अगदी अब्जापर्यंतचे संख्यालेखन आणि गणिती  क्रियाही मुले करत आहेत. त्यांची गुणवत्ता वाढली आहे. एवढेच तर हवे असते.’