विघ्नहर्त्यां गणरायाचे आगमन उद्या (गुरुवारी) होत आहे. या पाश्र्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून गणेशमूर्ती, गौरींचे मुखवटे तयार करणाऱ्या कारागिरांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन बनविलेल्या आकर्षक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या नक्षीदार, आकर्षक रंग व टीव्ही मालिका, चित्रपटाचा प्रभाव पडलेल्या आकर्षक मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले असले, तरी हौसेला मोल नाही या उक्तीप्रमाणे अनेक गणेशभक्तांनी महागडय़ा आणि मोठय़ा मूर्तीचे बुकिंग केले आहे. कमीतकमी २० रुपयांपासून ते जास्तीतजास्त १५-२० हजार रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती शहरातील शिवाजी चौक परिसरात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मंडप सजावटीसाठी लागणारे मखर, विविधरंगी दिव्यांच्या माळा, पताका, रांगोळी, पूजाविधीसाठी लागणारी आरती पुस्तके, समयी, गुलाल, अगरबत्ती, नारळ यांची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. याच्या किमतीही मोठय़ा असल्या तरी गणेशभक्त होऊ दे खर्च.. असे म्हणत गणरायाची मोठय़ा उत्सवात प्रतिष्ठापना करण्यासाठी साहित्य खरेदी करीत आहेत.
गणरायाच्या आगमनानंतर येणाऱ्या गौरींच्या स्वागताचीही चाहूल घरोघरी असते. आकर्षक, हसमुख गौरींचे मुखवटे, गवळणी, बलजोडी यांसारख्या आकर्षक मूर्तीही बाजारात विक्रीस आल्या आहेत. दुष्काळी स्थितीमुळे मूर्तीच्या किमती स्थिर आहेत. काहीशा वाढल्या असल्या तरी भाविक, नागरिक ऋण काढीन, पण सण साजरा करीन, अशा मानसिकतेतून महागडय़ा वस्तू खरेदी करीत आहेत.