16 January 2019

News Flash

सदाभाऊंची बैठक उधळण्याचा डाव; शेतकरी स्थानबद्ध

औरंगाबादेत येणाऱ्या शेतकऱ्यांना शिल्लेगावातच रोखले

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक उधळण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना शिल्लेगाव पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.

औरंगाबादेत येणाऱ्या शेतकऱ्यांना शिल्लेगावातच रोखले

येथील विभागीय कार्यालयात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची आयोजित बैठक उधळून फाशी घेओ आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना शिल्लेगाव येथेच रोखून धरत स्थानबद्ध करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांना ठाण्यातच थांबवण्यात आले होते.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाचे तीन टप्प्यात महाराष्ट्रातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करिता मदत जाहीर केली होती. राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीअंतर्गत पीकविमा, कापूस कायद्यांतर्गत निधी, अशी मदत हेक्टरी ३७ हजार ८०० रुपयांपर्यंत मिळणार होती. कापूस बियाणे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या व संबंधित मंत्रिमहोदयांच्या संगनमताने राज्यातील जी.एच.आय. प्रक्रिया थांबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा बी.टी. कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गंगापूर, खुलताबाद व वैजापूर तालुक्यातील सुमारे ३०० ते ४०० शेतकरी विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर आंदोलन करणार होते, असे संतोष जाधव यांनी सांगितले. सकाळी नऊ वाजताच जाधव यांना शिल्लेगाव पोलिसांनी औरंगाबादमध्ये येण्यापासून रोखले.

जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी ताफ्यासह जाऊन वजनापूर येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या संदर्भात पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले की, आम्हाला काही शेतकरी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक उधळणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना रोखले. संतोष जाधव यांना ठाण्यातच स्थानबद्ध केले.

First Published on June 11, 2018 12:43 am

Web Title: sadabhau khot farmer movement