संचालक-जामीनदारांच्या १०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची चाचपणी

कर्जबुडवे प्रकरणामुळे चर्चेत आलेले राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंगच्या अन्य संचालकांकडून कर्जवसुलीसाठी त्यांच्या दिल्ली, गुडगाव व जयपूर येथील संपत्तीवर टाच आणता येऊ शकते काय, याची चाचपणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. साकोळ येथील जमीन व कारखान्याची यंत्रसामग्री विक्री केल्यास दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

मात्र, येथील संपत्तीबाबत जोपर्यंत लिलाव होत नाही तोपर्यंत संचालकांच्या अन्यत्र असणाऱ्या संपत्तीवर टाच आणता येणार नाही, असे अंतरिम निर्देश ऋण वसुली प्राधिकरणाने दिले होते. या आदेशाचा उपयोग करून दिल्ली, गुडगाव व जयपूर येथील सुमारे १०० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांकडे बँकांनी लक्ष घालण्याचे ठरविले आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंगच्या कर्ज प्रकरणात मंत्री होण्यापूर्वी आशिष मारवा यांच्यामार्फत तडजोड करून ४१ कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविण्यात आली होती.

मात्र, बँकेने ती धुडकावली. दरम्यान, बराच कालावधी गेल्यानंतरही नव्या तडजोडीसाठी पुन्हा चर्चा झाली. मात्र, तेव्हा अधिक रक्कम देण्याऐवजी नव्याने केवळ १६ ते १८ कोटी रुपयांवरच तडजोड करावी, असा प्रस्ताव निलंगेकरांच्या वतीने बँक अधिकाऱ्यांना तोंडी दिला होता. संचालक व जामीनदारांच्या गहाण खतात नसलेल्या संपत्तीचे विवरण बँकांनी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

दिल्ली, गुडगाव, जयपूर येथील सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेता येऊ शकेल काय, याची चाचपणी बँकेकडून केली जात आहे. महाराष्ट्र बँक व युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परराज्यातील संपत्तीचे विवरण मिळविले आहे.

विशेष म्हणजे ऋण वसुली प्राधिकरणानेही गहाण खतामध्ये नमूद नसणारी संपत्तीदेखील ताब्यात घेता येऊ शकेल, असे अंतरिम आदेशात नमूद केले असल्याचा दावा बँकांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वसुली विवरण पत्रात केला आहे. नव्याने एकमुश्त रक्कम भरुन तडजोड करण्याचा प्रस्ताव ४१ कोटींवरुन १८ कोटींवर घसरला असल्याने तो मान्य होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे फडणवीस सरकारमधील कर्जबुडवे कलंकित मंत्री संभाजी पाटील यांच्यामुळे सरकारची पुढील काळातही बदनामी होण्याची शक्यता अधिक असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ज्यांनी निलंगेकरांच्या मंत्रिपदाला जाणीवपूर्वक विरोध केला त्यांनीच ही माहिती पुरवली असावी, या संशयापोटी अनेक वरिष्ठ नेत्यांची एकमेकांमध्ये फोनाफोनी झाल्याचीही माहिती आहे.  दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांचा बुधवारी निलंगा येथे सर्वपक्षीय सत्कार होणार आहे.

बँकांमधील सार्वजनिक पैशाच्या अपव्ययावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे आक्रमक वक्तव्ये करीत असताना राज्यातील कर्जबुडवेगिरी करणाऱ्या मंत्र्यांना भाजप नेते कोणता सल्ला देणार, असा सवाल विचारला जात आहे.