राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांना आíथक गरव्यवहाराच्या कारणावरुन अटक केल्याची येथे तीव्र प्रतिक्रिया उमटली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या मुद्दय़ावर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले. जालना रस्त्यावर रास्ता रोको करुन टायर जाळण्यात आले, तर एका बसवरही दगडफेक करण्यात आली. भुजबळ कुटुंबीयांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा डाव भाजप सरकारने आखला असल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी निषेध केला. पोलिसांनी या बाबत १४जणांवर गुन्हे दाखल केले.
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली जालना रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. या वेळी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून दिले, तर औरंगाबादकडून सोलापूरकडे जाणाऱ्या बसवर (एमएच १४ बीटी २६१३) दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी १४जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.