ऐन दिवाळीतील कार्यक्रमामुळे चर्चेला तोंड फुटले

शहरातील प्रमुख असलेल्या संत एकनाथ नाटय़गृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न तीन महिन्यांपूर्वी अभिनेता सुमीत राघवन यांनी समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसृत करून ऐरणीवर आणल्यानंतर त्यावर बरीच खळबळ उडाली होती. आता ऐन दिवाळीत शहराच्या सिडको भागातील संत तुकाराम नाटय़गृहाचीही देखभालीअभावी कशी वाताहत झाली आहे, हे समोर आले आहे.

संत तुकाराम नाटय़गृहात दिवाळी पाडवा पहाटनिमित्त पंडित उपेंद्र भट यांचा शास्त्रीय गायनाचा व श्रीकांत नारायण व त्यांच्या चमूंचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे होते. कार्यक्रमाच्या मध्यंतरात मान्यवरांच्या सत्कारात नाटय़गृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत आला. यापुढे येथे कार्यक्रम घेऊ नका, असे चव्हाण यांना जाहीरपणे सूचवण्यात आले. त्यावर चव्हाण यांनी कार्यक्रमापूर्वी नाटय़गृहातील अनेक गैरसोयींमुळे त्यांच्या आयोजकातील प्रमुखांना कशी कसरत करावी लागली, याचे वर्णन कथन केले. इतरांनी या नाटय़गृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नव्या रूपातील छायाचित्रे काढून जपून ठेवावीत, असे पुन्हा पाहायला मिळणार नाही, असे सूचक वक्तव्य केल्याची आठवण करून दिली.

संत तुकाराम नाटय़गृहातील रंगमंचाचा मुख्य पडदाच बंद आहे. मागील बाजूचे पडदेही नाहीत. म्युझिक यंत्रणा बंद आहे. अनेक ठिकाणची वायरिंग दुरुस्तीला आलेली आहे. मुख्य सभागृहात प्रवेशापूर्वीच्या भागात छताच्या खाली लावलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे आच्छादन गळून पडले आहे. अनेक ठिकाणच्या फरशा निघालेल्या आहेत.

संत तुकाराम नाटय़गृहाच्या दुरवस्थेचे वर्णन ऐकल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी अभिनेता सुमीत राघवन यांनी ‘संत एकनाथ’च्या वाताहतीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसृत करून उठवून दिलेल्या वादळाची आठवण झाली. सुमीत राघवन यांनी संत एकनाथ नाटय़गृहातील रंगमंचावरील खिळखिळ्या झालेल्या फळ्या, बंद असलेला पडदा, रिंगाविना सुरू असलेले हे नाटय़गृह, अशा अनेक प्रकारे वाताहत झालेले असल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर शिवसेना आमदार संजय सिरसाट, खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन मदतीसाठी निधीची घोषणा केली. त्यानंतरही आजच्या परिस्थितीत संत एकनाथ नाटय़गृहाच्या तीन महिन्यांपूर्वीच्या अवस्थेत काहीही बदल झालेला नाही. दुरुस्तीच्या कुठल्याही कामाला सुरुवात झालेली नाही.

दुरुस्तीबाबतचे पत्र दिलेले आहे

संत एकनाथ नाटय़गृहाच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका अभियंत्यांना पत्र दिलेले आहे. त्याला आता दोन महिने लोटले आहेत. अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही. आम्हाला नाटकांच्या बुकिंगबाबतही निर्णय कायम घ्यायचा ते कळत नाही. नाटय़गृहाला आता २८ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आठ-दहा वर्षांपूर्वी काही दुरुस्तीचे काम झालेले आहे. आता नव्याने दुरुस्तीची गरज आहे.

– मनोज पाटील, व्यवस्थापक, नाटय़गृह.