महापालिका क्षेत्रात नव्याने समावेश झालेल्या शहरातील सातारा व देवळाई येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. सातारा वार्डात काँग्रेसच्या सायली भागवत जमादार यांनी ३ हजार ४३ मते मिळवत शिवसेनेच्या पल्लवी मनोहर गायकवाड यांचा पराभव केला, तर जिल्हा परिषद गोलटगाव गटाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभाताई लाळे विजयी झाल्या. देवळाई प्रभागात भाजपचे अप्पासाहेब विनायक हिवाळे विजयी झाले. अंतर्गत लाथाळ्यांमुळे शिवसेनेचा पराभव झाल्याचे मानले जाते.
औरंगाबाद शहरालगतच्या सातारा व देवळाई परिसरातून शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा दावा केला जात होता. मात्र, एक जागा भाजपाला व एक जागा काँग्रेसला मिळाली. शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. देवळाई प्रभागात ८ उमेदवार िरगणात होते. नामदेव गणपत वाजड, रवींद्र सुखदेव बनकर, मृणालिनी प्रशांत लाटकर, पार्वती रतनलाल मुंदडा, राजू काका नरवडे, शेख जियाउल्लाह शेख अकबर हे उमेदवार िरगणात होते. मात्र, खरी लढत भाजप व सेनेच्या उमेदवारात होती. अप्पासाहेब हिवाळे भाजपकडून, तर हरिभाऊ हिवाळे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. पोटनिवडणुकीत यश मिळावे म्हणून शिवसेनेने बरेच प्रयत्न केले. मात्र, भाजप उमेदवाराने शिवसेनेपेक्षा ९४२ मताधिक्य मिळवत विजय मिळवला. विशेष म्हणजे शिवसेनेने या प्रभागात रात्रीतून सिमेंट रस्त्यावर डांबर टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही प्रभागांत खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री रामदास कदम यांनीही सभा घेतल्या होत्या.
सातारा प्रभागात भाजपकडून सुरेखा पुजाबा बावस्कर यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेने पल्लवी मनोहर गायकवाड यांना िरगणात उतरविले होते. मात्र, काँग्रेसच्या सायली भागवत यांनी ३ हजार ४३ मते मिळवत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. पल्लवी गायकवाड यांना २ हजार ८६३ मते मिळाली. दोन्ही प्रभागांत मतदारांनी नकाराधिकाराचाही वापर केला. भाजपच्या विजयात शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसकडूनही विजयासाठी व्यूहरचना लावण्यात आली होती. शहरासह परिसरात शिवसेनेचा दबदबा आहे, असे वातावरण निर्माण केले जाते. मात्र, पोटनिवडणुकीतील निकालानंतर शिवसेनेचा जोर ओसरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.