जिल्ह्य़ात ३ लाख २५ हजार सातबारे ऑनलाईन झाले असून ते मंगळवार, ७ जूनपासून पाहता येतील. सातबारा उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तलाठय़ाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. साताबारा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया २०१४ मध्ये सुरू झाली होती. कन्नड, फुलंब्री आणि खुलताबाद या तीन तालुक्यातील सातबारे पूर्वीच ऑनलाईन करण्यात आलेले आहेत.

सातबारा काढण्यासाठी तलाठय़ांकडून बऱ्याचदा आडकाठी आणली जाते. हस्तलिखित सातबाऱ्यात चुकाही होतात. ऑनलाईन सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यात घोळ होते. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांनी सर्व सातबारे ऑनलाईन करण्याचे आदेश दिले होते. ३१ डिसेंबपर्यंत ही कार्यवाही व्हावी, असे अपेक्षित होते. मात्र, सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने प्रक्रिया रखडली. महाऑनलाईन सव्‍‌र्हरमध्ये तयार माहिती जात नव्हती. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. आता औरंगाबाद, पैठण, सोयगाव, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर या सहा तालुक्यांतील सातबारे ऑनलाईन झाले असून मूळ सातबाऱ्याशी जुळवणी करून नोंदी घेण्यात आल्या आहेत. ऑनलाईन सातबारा करताना काही चूक झाली असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.