भाजपचे पत्की कोटय़धीश, राष्ट्रवादीचे काळे लखपती

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्चाला बंधन असते. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विधान परिषदेची असल्याने या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्चाला कोणतेही बंधन नाही. परिणामी राष्ट्रवादीने मंगळवारी गाडय़ांची लांबच लांब रांग लावली. भाजपनेही मंत्र्यांच्या ताफा मैदानात उतरवत ७६ तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांना आवर्जून निमंत्रित केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये असणारी ही बंधने शिक्षक मतदारसंघासाठी का नाहीत, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. आयोगाकडून तशा सूचना नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान औरंगाबाद विभागातील या निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करणाऱ्यांपैकी भाजपचे उमेदवार सतीश पत्की यांनी १ कोटी १९ लाख ३० हजार रुपयांच्या संपत्तीचे तर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरण ६४ लाख ६ हजार १०७ रुपये असल्याचे शपथपत्राद्वारे निवडणूक विभागास कळविले आहे.

शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीमध्ये उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्हय़ातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हे उस्मानाबाद तालुक्यातील पळसप या गावचे आहेत. तर शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करणारे प्रा. गोविंद काळे हे उस्मानाबाद जिल्हय़ातील तुळजापूर येथे प्राध्यापक आहेत. तसेच शिक्षक संघटनांमध्ये अनेक वष्रे काम करणारे व्ही. जी. पवार हे देखील उस्मानबादचेच आहेत. भाजपचे सतीश पत्की बीडचे आणि कालिदास माने लातूरचे असल्याने या मतदारसंघात या तीन जिल्हय़ांचा अधिक प्रभाव दिसून येत आहे. उमेदवारांमध्ये मात्र लातूर बीडचा प्रभाव अधिक आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक वष्रे सचोटीने काम करणारे अशी ओळख असणाऱ्या दिलीप सहस्रबुद्धे यांचाही अर्ज निवडणुकीमध्ये असल्याने शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वाचे प्रश्न चर्चेत येतील, असे मानले जात आहे. बुधवारी उमेदवारांच्या अर्ज छाननीदरम्यान सर्व २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. शिक्षक मतदार असल्याने आतापर्यंत या मतदारसंघातील प्रचार फारसा पातळी सोडून कधी झाला नाही. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीवरील शिक्षक मोर्चामुळे वातावरण बदलू लागले आहे.

या मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावण्या संदर्भात बुधवारी नव्याने सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण निवडणुकांमध्ये मतदानानंतर डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जात असे. आता हात बदलण्यात आला आहे. उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असली तरी या वेळी उमेदवारांची संख्या तुलनेने अधिक असेल, अशी शक्यता आहे.