25 November 2020

News Flash

खैरेंच्या राजकीय बांधणीला केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह यांची हजेरी

वैदिक संमेलनास खास केंद्रीय राज्यमंत्री मानव विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांना आमंत्रित केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मानव विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह

समांतर आणि नामांतर असे दोन विषय हाताळत खासदार खरे यांची सुरू असणाऱ्या लोकसभा मतदारसंघ बांधणीला पूरक ठरू शकणाऱ्या अखिल भारतीय वैदिक संमेलनास खास केंद्रीय राज्यमंत्री मानव विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांना आमंत्रित केले आहे. १९ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या ‘वेद आणि विज्ञान’ या विषयावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे असे वैदिक संमेलने औरंगाबाद येथे लोकसभा निवडणुकांपूर्वी होत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारणे लोकसभा निवडणुकीची तयारी मानायची का, असा प्रश्न खासदार खैरे यांना विचारला असता ते स्मितहास्य करत, असे आणखी बरेच काही कार्यक्रम होतील, असे सांगितले.’

औरंगाबाद शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी मंजूर समांतर जलवाहिनीची योजना महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी विरोध करून मोडीत काढली. त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सध्या खासदार चंद्रकांत खैरे प्रयत्न करीत आहेत. खासदार सुभाष चंद्रा यांच्या कंपनीकडे हे कंत्राट असल्याने पुन्हा ही योजना सुरू करण्यासाठी राजकीय पटलावर या अनुषंगाने बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. पाणी योजना सुरू करण्यात आलेले अपयश लक्षात घेऊन शिवसेनेकडून आता समांतर बरोबरच औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे आणला जात आहे. खासदार खैरेच हा विषय माध्यमांमध्ये चर्चेत आणत असतात. वैदिक संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खैरे यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यासाठी आपण कसे गंभीर आहोत, हे पत्रकारांना सांगितले. १७ जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री व खासदारांच्या बैठकीमध्ये हा विषय पुन्हा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका बाजूला पिण्याच्या पाण्याची समांतर पाणीपुरवठा योजना आणि दुसऱ्या बाजूला नामांतर असे विषय हाताळत लोकसभा निवडणुकीच्या बांधणीसाठी खासदार खैरे एप्रिलपासून ग्रामीण भागात दौरे करणार आहेत. तत्पूर्वी निवडणुकीमधील हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरतेने पुढे मांडता यावा व त्यातून प्रखर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा घडावी या प्रयत्नांचा भाग म्हणून होणाऱ्या अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष ते दरवेळी आवर्जून स्वत:कडे घेतात. या कार्यक्रमास खासदार खैरे यांची नेहमी मदत होते, असे संयोजक पं. दुर्गादास मुळे यांनी सांगितले. ही संमेलने या पूर्वी १९९७, २०००, २०११ मध्ये झाली होती. अशी संमेलने लोकसभा निवडणुकांपूर्वी आवर्जून घेतली जातात का, असे खासदार खैरे यांना विचारले असता, ‘असे आणखी कार्यक्रम होतील’, असे ते म्हणाले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे सध्या ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी करीत आहेत. मात्र, ‘त्यांचे नाव पुढे जाणार नाही, उमेदवार मीच असेन,’ असेही खरे यांनी पत्रकांराशी बोलताना स्पष्ट केले.

सत्यपालांचे वेदविचार आणि युवक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अशी ओळख असणारे सत्यपालसिंह यांना भाजपने खास मंत्रिपद बहाल केले. त्यांचा वेदावर अभ्यास असल्याचा दावा अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या संयोजकांनी केला आहे. त्यांच्या सुमधूर वाणीतून युवकांपर्यंत वेदविचार पोहचविण्यासाठी १९ जानेवारी रोजी सत्यपालसिंह यांच्या भाषणाचा विशेष कार्यक्रम खास तरुणांसाठी आयोजित केल्याचे या संमेलनाचे संयोजक दुर्गादास मुळे आणि अध्यक्ष अनिल भालेराव यांनी केला.

डॉ. कराड यांची उमेदवारीही मीच मिळवून देईन

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात भाजपचा उमेदवार असेल, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांनीही तयारी सुरू केली आहे. ते तसे कमकुवत उमेदवार असतील असे आडून सांगताना खासदार खैरे म्हणाले, ‘त्यांना भाजपची उमेदवारी हवी असेल तर मीच मिळवून देईन की. त्या पक्षातही आपली काही मंडळी आहेतच.’ या शब्दात त्यांनी कराड यांच्या उमेदवारीच्या चर्चेची खिल्ली उडवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 2:44 am

Web Title: satyapal singh to attend all india vedic conference
Next Stories
1 रिपब्लिकन ऐक्य फक्त प्रकाश आंबेडकरच करू शकतात : आठवले
2 एक पाऊल स्वच्छतेचे, पुढे जाणारे!
3 औरंगाबादेतील ३५ हजार मालमत्ताधारक कर बुडवतात
Just Now!
X