औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे यासाठी शहरात शुक्रवारी ‘सावता परिषद’ घेण्यात आली. माळी समाजाची राजकीय कुचंबणा होत असल्याने किमान दोन मंत्रिपदे समाजातील आमदारांना मिळावीत, अशी मागणी सावता परिषदेचे प्रमुख कल्याण आखाडे यांनी केली. राज्यभरातून आलेल्या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आमदार सावे यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी जोरदारपणे करावी यासाठी प्रसंगी आक्रमक व्हावे, असे नेत्यांना सांगितले. या परिषदेला सावे यांची उपस्थिती होती.

राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ४० हजारांहून अधिक माळी समाजाचे मतदार आहेत. बहुसंख्येने असणारा माळी समाज आक्रमक नसल्यामुळे त्यांना सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. माळी समाज आणि सत्ताकारण या विषयावर सावता परिषदेने घेतलेल्या ‘गोलमेज’ परिषदेत उद्धवराज महाजन, अविनाश ठाकरे, सुहास शिरसाट यांनी मंत्रिपदासाठी सावे हे योग्य उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी शब्द टाकावा, असे सांगितले. छगनदास म्हेत्रे म्हणाले, आता वेळ आली आहे आक्रमकपणे सत्तेतला वाटा मागायला हवा. अनेक दिवसांपासून भाजपमध्ये काम करणाऱ्या माळी समाजाच्या कार्यकर्त्यांना योग्य ते पद मिळत नसल्याचे सांगत सावे यांच्यासाठी समाज एकवटला असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.

माळी समाजाचे भाजपचे ५ आमदार आहेत. मनीषा चौधरी, भीमराव धोंडे, देवयानी फरांदे, अतुल सावे व योगेश टिळेकर या पाच आमदारांपैकी धोंडे हे पूर्वीही आमदार होते. अन्य चौघे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.