नदी उकरायची, खोल करायची. त्यात साठलेल्या पाण्याचे छायाचित्रही डोळ्याला आनंद देते. त्याचे कौतुकही होते. परिणामी सरकारी यंत्रणेलाही नद्यांचे खोलीकरण हेच काम जास्त आवडू लागले. या कामासाठी ठेकेदारही पुढे येतात. या वर्षीही मराठवाडय़ात खोलीकरणाचे काम झाले ते २१११ किलोमीटरचे. या कामाचे अगदी ड्रोन कॅमेऱ्यानेही फोटो काढले; पण ज्या कामातून पाण्याचा अधिक पाझर होतो त्या बांधबंदिस्तीच्या कामाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. या वर्षी ९७८९९ हेक्टरावर बांधबंदिस्तीची कामे हाती घ्यायची होती. ती झाली केवळ ५६ हजार ७२१ हेक्टरावर म्हणजे केवळ २९.४० टक्के.

नदी खोलीकरणाचं सर्वत्र कौतुक होत असताना वैजापूर तालुक्यातील लोणीबुद्रुकचे शेतकरी मात्र त्यांचा बांधबंदिस्तीच्या कामाचा वेगळाच अनुभव सांगतात. शहाराम विश्वनाथ मगर सांगत होते, ‘‘पाणी कसं पाझरतं, याचं गणित अलीकडंच उमगलं. एका हेक्टरवर २० लाख लिटर पाणी एका पावसात येऊ शकतं. एक मीटर खोलीचा चर २०० मीटर खोदला की, मिळणारं पाणी उत्पादन वाढवू शकतं.’’ लोणीबुद्रुक या एकाच गावात ३२५ हेक्टरावर शेतकऱ्यांची बांधबंदिस्ती झाली आहे. यासाठी कृषी विभागाला खर्च आला केवळ १४ लाख ९० हजार. खरे तर अंदाजपत्रक ३४ लाखांचे होते, पण सचोटीने काम केले आणि मगर या शेतकऱ्यासह भोवतालच्या अनेकांना त्याचा फायदा होणार आहे. काम जरी कमी किमतीचे असले तरी ते काम गाव अधिक पाणीदार करणार असल्याचा दावा कृषीचे उपविभागीय अधिकारी उदय देवळाणकर करतात. जलयुक्त शिवारमध्ये ३२ प्रकारची कामे हाती घेतली जातात. त्यातील पहिले काम सलग समतल चराच असायला हवे. शासनदरबारी जेव्हा अहवाल दिला जातो, तेव्हा हे काम किती महत्त्वाचे आहे, हे सांगणारे अधिकारी खूप आहेत. मराठवाडय़ात ९८३ हेक्टरांवर सलग समतल चर करायचे होते. डोंगराच्या वर अरुंद आडवा चर खणला जातो. पडलेला पाऊस माती वाहून घेऊन जातो. ती माती पाणी साठलेल्या खड्डय़ात थांबविण्यासाठी असे चर खणणे आवश्यक असते. पाणलोटाच्या कामाचे हे तत्त्व जलयुक्त शिवार योजनेत जशास तसे आलेले. ९८३ हेक्टरावर १४ हजार ७२७ सलग समतल चर घेण्याचे ठरविण्यात आले होते; पण एकूण झालेले काम केवळ १८.६५ टक्के. या कामाचा पुढचा टप्पा कंपार्टमेंट बंडिंगचा. म्हणजे बांधबंदिस्तीचा. ९७ हजार ८९९ हेक्टरवर ही कामे करायची होती. पूर्ण झालेल्या कामाची टक्केवारी केवळ २९.४०. आता पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे ही कामे थांबतील. मग वर्षभर ठरविलेली कामे का झाली नाहीत? उत्तर प्रशासकीय यंत्रणांच्या मानसिकतेत दडले आहे.

मराठवाडय़ात जलयुक्तचे काम म्हणजे काय, असा प्रश्न कोणालाही विचारला की, येणारे उत्तर नदी उकरण्याशी संबंधित असते. नदी खोलीकरण आणि रुंदीकरण हे प्रमुख काम मानले जाते. या वर्षांत १८८५ किलोमीटपर्यंत नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. त्यावर ४७.७१ कोटी रुपये खर्च झाले. एका किलोमीटरसाठी २ लाख ५३ हजार १०३ रुपये. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नदी खोलीकरणावर होणारा खर्च एका बाजूला आणि दुसरीकडे बांधबंदिस्तीसाठी येणारा हेक्टरी खर्च केवळ ५ हजार ६०० रुपये. कमी किमतीत अधिक काम उभे करण्याची संधी असतानाही केवळ काम दिसावे या हेतूने नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाकडे प्रशासनाने लक्ष दिले. याचे कारण त्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये आहे. बांधबंदिस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदारही पुढे येत नाहीत. किमान तीन वेळा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर त्या रद्द कराव्या लागतात, अशी परिस्थिती आहे. बांधांवरून शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या वादामुळे ही कामे फारशा गतीने होत नाहीत. तुलनेने नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना अधिक फायदा होतो. या कामाचे दृश्यरूप कौतुकाचे असल्यामुळे जलयुक्तची छोटी कामे हाती घेतली जात नाहीत. डोंगरावरून येणारे पाणी थांबविण्यासाठी दगडी बांध करावेत, असे ठरविण्यात आले. झालेली कामे केवळ ३.१२ टक्के आहेत. ठेकेदारांना रस असतो तो सिमेंट-नालाबांधाच्या कामामध्ये. या वर्षी २५२ बंधारे बांधायचे होते. त्यातले १७५ बंधारे पूर्ण झाले. सिमेंटचे बंधारे लघुपाटबंधारे विभागाच्या स्थानिक स्तर विभागाकडून केली जातात. गंगापूर तालुक्यातील सावंगी गावाजवळील मरकडेय नदीवर सिमेंटचा एक बंधारा केला जात होता. भिसेन नावाच्या उपअभियंत्यांना विचारले, या नदीवर खोलीकरण करणे चांगले की सिमेंटचा बंधारा टाकणे योग्य. त्यांना उत्तर देता आले नाही. पाण्याचा वेग संथ करण्यासाठी सिमेंटचे बंधारे टाकले जातात; पण पाण्याच्या वेगाचे गणित गृहीत न धरताच सिमेंट बंधारे बांधकामाचा वेग प्रशासनाने चांगलाच वाढवल्याचे दिसून येत आहे.

जेथे काम झाले की, छायाचित्र चांगले दिसेल, अशा कामांना वेग आला आहे. त्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेची भर पडली आहे. छोटय़ा कामातून पाणलोट विकसित होऊ शकतो. हे दीर्घकालीन जलयुक्तचे तत्त्व मात्र पाळले जात नाही.