शहरातील समस्यांबाबत नगरसेवकांनी दिलेल्या सर्व तक्रारी व अर्जाचे आता स्कॅनिंग होणार असून ती प्रत नवनियुक्त आयुक्त सुनील केंद्रेकर स्वत:कडे ठेवणार आहेत. नगरसेवकांनी त्यांच्या तक्रारी लिखित स्वरूपात दिल्यास त्याचा पाठपुरावा करता येईल म्हणून भेटून तक्रारी व अर्ज द्यावे, असे आवाहन त्यांनी सर्वसाधारण सभेत केले. तसेच करांच्या वसुलीबाबतही आज बैठक घेऊन जर पुढील महिन्यात करवसुलीचे आकडे वाढले नाहीत तर संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पुन्हा एकदा नगरसेवकांनी वेगवेगळ्या स्वरूपातील तक्रारींचा पाढा वाचला. तक्रारींचे स्वरूप एवढे अधिक होते की, त्या लिखित स्वरूपात असल्यास पाठपुरावा करणे सोपे होईल, असे ते म्हणाले. रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केंद्रेकरांनी कामाचा धडाका सुरू केला. गुरुवारी रात्री महापालिकेजवळील एका रस्त्याचे काम नाहक थांबविल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या कामाला भेट देऊन ते तातडीने सुरू करण्यात आले. त्याबद्दल नगरसेवकांनी आभारही मानले. वसुली अधिकाऱ्यांच्या बैठकीत करवसुलीचे प्रमाण केवळ २६-२७ टक्के असल्याचे केंद्रेकर यांना दिसून आले. त्यांनी पुढच्या महिन्यापर्यंत वसुली वाढविण्याचा कार्यक्रम दिला आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत ‘स्मार्ट सिटी’वरही सादरीकरण करण्यात आले. यावेळी या प्रकल्पासाठी दोन प्रकल्प समित्या का नेमण्यात आल्या आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना एकूणच स्मार्ट सिटीविषयीची भूमिका केंद्रेकर यांनी मांडली. ते म्हणाले, एक प्रकल्प व्यवस्थापन समिती जनजागृतीसाठी नेमण्यात आली होती आणि दुसरी प्रकल्प व्यवस्थापन समिती लोकांच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यासाठी, कुटुंब सर्वेक्षण करून त्याचे फॉर्म एकत्रित करण्यासाठी नेमण्यात आली आहे. या समित्या कशा काम करत आहेत, याविषयी मतमतांतरे असली तरी त्यांना आधी काम करू देऊ आणि त्यांनी कमी काम केले असेल तर त्यांची देयके देताना सर्व बाबी तपासल्या जातील, असे ते म्हणाले. त्यामुळे स्मार्ट सिटीतील प्रकल्प व्यवस्थापन समितीच्या कार्याचे मूल्यांकन देयके अदा करताना केले जाईल, असे संकेत त्यांनी दिले. ग्रीनफिल्ड शहर उभारताना ऊर्जाविषयक अनेक बाबी तपासाव्या लागणार आहेत. विशेषत: या भागातील नव्या सुविधा इलेक्ट्रॉनिक आधारावर आणि डिजिटलाइज्ड करण्याकडे भर असेल, असेही ते म्हणाले.
नक्षत्रवाडी येथील २७० एकरात ग्रीनफिल्ड सिटी उभारण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या अनुषंगाने तीन प्रस्ताव तयार करण्यात आले असून सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे सांगितले जात आहे. या प्रकल्पासाठी या वर्षी १०० कोटी रुपये मार्चपूर्वी मिळण्याची शक्यता आहे.