दख्खन भागात सापडणाऱ्या ‘आयसोमॅट्रस इसादेन्सीस’ हा दुर्मिळ जातीचा विंचू मराठवाडय़ातील संशोधकांना नव्याने सापडला आहे. परभणी जिल्ह्य़ातील इसाद गावी हा विंचू पहिल्यांदा दिसला होता. तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा हा विंचू जालना जिल्ह्य़ातील दरेगाव शिवारात आढळल्याचे विंचू विश्वात अभ्यास करणारे जिशान मिर्झा, रमण उपाध्ये आणि राजेश सानप यांनी म्हटले आहे.
जालना जिल्ह्य़ात सन १८००च्या सुमारास थॉमर केव्हेरील हा शास्त्रज्ञ कार्यरत होता. त्याची विशाखापट्टणमला बदली झाली. त्यापूर्वी थॉमर यांनी मराठवाडय़ातील जैवविविधतेचा अभ्यास केला होता. मराठवाडय़ात १० ते १२ प्रकारचे विंचू आढळून येतात. यातील आयसोमॅट्रस इसादेन्सीस या िवचवाच्या नावातील इसाद हा उच्चार तो पहिल्यांदा जेथे सापडला, त्याच्याशी संबंधित असल्याचे रमण उपाध्ये सांगतात.
जालना जिल्ह्य़ात विंचवाचे अभ्यासक असणाऱ्या या तिघांच्या चमूने दरेगाव येथे पुन्हा एकदा हा दुर्मिळ जातीचा विंचू दिसल्याचे सांगितले. मराठवाडय़ात आढळून येणाऱ्या विंचवाची लांबी २० मिमी ते १५ सेंमीपर्यंत असते. मात्र, हा दुर्मिळ जातीचा विंचू केवळ १९ ते २० मिमी एवढय़ाच आकाराचा आहे. डॉ. देशभूषण बस्तबडे यांनी भारतीय विंचवाचा मोठय़ा प्रमाणात अभ्यास केला. १९८३ मध्ये ‘फाउना ऑफ इंडिया : स्कॉर्पिओनिडा’ या पुस्तकात याचे वर्णन केले होते.
परभणी जिल्ह्य़ात सापडलेला हा विंचू गेल्या ३३ वर्षांपासून अभ्यासकांच्या दृष्टीस पडला नव्हता. कोरडे हवामान व गवताळ प्रदेशात हा विंचू आढळल्यानंतर त्याचा विस्ताराने अभ्यास करण्यात आला. नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्समध्ये काम करणाऱ्या जिशान मिर्झा यांनी कोलकात्यात हा विंचू आयसोमॅट्रस इसादेन्सीस असल्याचे आवर्जून सांगितले. हा जीव जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र, तो पुन्हा सापडल्याने विंचवाच्या विश्वात अभ्यास करणारे तज्ज्ञ खूश झाले आहेत. त्यांच्या मते अन्नसाखळीतील हा महत्त्वाचा दुवा होता. असे अनेक जीव अलीकडे नामशेष होत आहेत. त्यांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन हे आवश्यक असल्याचे रमण उपाध्ये सांगतात. शेतीतले कीटक खाऊन हा विंचू जगतो. त्याचा वावरही रहिवासी भागात फारसा दिसून येत नाही.