News Flash

सारथी’कडून १०० विद्यार्थ्यांनाच अधिछात्रवृत्ती देण्याचा विचार

सारथीने ५०२ जागांसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये अधिछात्रवृत्ती देण्याच्या संदर्भाने जाहिरात काढली होती.

अ‍ॅग्रीकल्चर डॉक्टर असोसिएशनचा आरोप; मुलाखत २४१ विद्यार्थ्यांची

औरंगाबाद : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पीएच.डी., एम.फिल. साठी देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी केवळ १०० विद्यार्थ्यांचीच निवड करण्याचा विचार करत आहे, असा आरोप अ‍ॅग्रीकल्चर डॉक्टर असोसिएशनने (एडीए) केला आहे. तर मुलाखत घेतलेल्या २४१ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी एडीएसह इतर काही संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे.

सारथीने ५०२ जागांसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये अधिछात्रवृत्ती देण्याच्या संदर्भाने जाहिरात काढली होती. त्यातून ३४१ जणांची एक यादी प्रसिद्ध केली. यामधून २४१ विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरवले. २३ ते २७ मार्च २०२१ दरम्यान, पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. यातून अधिछात्रवृत्तीसाठी केवळ १०० विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात येईल, असा विचार सुरू असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. त्याचा फटका बऱ्याच संशोधक विद्यार्थ्यांना बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप एडीएने केला आहे. मराठा, कुणबी समाजातील संशोधक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथीचे अधिछात्रवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कपात करण्याचे पाऊल हे बाधक ठरणारे आहे, असेही संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक काकडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. सारथीचे संचालक कोकाटे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या संदर्भात माहिती घ्यावी लागेल, असे सांगितले.

गुणवत्ता यादी काढण्याचा विचार

सारथीच्या पुणे येथील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अधिछात्रवृत्ती देताना कुठेतरी गुणवत्ता क्रमांक असावा, असा विचार सुरू आहे. मात्र, अद्याप संख्यानिश्चित करण्याच्या निर्णय झालेला नाही. ४ मे रोजी बैठक होणार होती. मात्र, करोनाच्या पाश्र्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक होऊ शकली नाही. राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिपसाठी नेट-सेटची अट आहे. तर बार्टीसाठीच्या अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना देशातील प्रमुख विद्यापीठांचा विचार घेतला जातो. अधिछात्रवृत्ती कोणाला, कधीपासून द्यायची, याचे निकष सारथीच्या संकेतस्थळावर स्पष्ट शब्दात दिलेले आहेत.

सारथीने २०२० साठी मुलाखत घेण्यात आलेल्या सर्व २४१ विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्तीसाठी पात्र ठरवावे. बार्टी, राजीव गांधी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती, नॅशनल फेलोशिप फॉर ओबीसी-एस.टी.-एस.सी. प्रमाणे प्रवेश दिनांकापासून लाभ देण्यात यावा.

– डॉ. रोहित चव्हाण, अध्यक्ष, कृषी आचार्य पदवीधर संघटना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:41 am

Web Title: scholarships students sarathi doctors interview ssh 93
Next Stories
1 दुधासह भुकटीच्या खरेदी दरात घसरण
2 रुग्णालयाच्या दारात मृत्यू; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही विलंब
3 औरंगाबादमधील रुग्णसंख्या घसरणीला!
Just Now!
X