सुहास सरदेशमुख

टाळेबंदीनंतर अनेकांच्या हातचे काम गेल्यानंतर गेल्या महिन्याभरात भंगार गोळा करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. दसरा-दिवाळीच्या काळात हंगामी भंगार गोळा करणारे वाढतात, पण या वर्षी हे प्रमाण तुलनेने अधिक आहे. भंगार खरेदी करणारे शमीम पठाण म्हणाले,‘अनेकांच्या हाताला काम नाही. या धंद्यात हातगाडी एवढेच भांडवल लागते. त्यामुळे अनेक तरुण भंगार गोळा करून आणत आहेत.’ भंगार वस्तू गोळा करणाऱ्यांना मिळणाऱ्या दरात तशी वाढ नाही. मात्र, मनुष्यबळ वाढल्याचे दिसत असून हा करोना काळातील टाळेबंदीचा परिणाम असल्याचेही सांगण्यात येत आहे. ही वाढ राज्यातील मोठय़ा शहरांमध्ये दिसून येत आहे.

टाळेबंदीच्या काळात अनेक भंगार विक्रेत्यांनी भाजी विक्रीचे काम हाती घेतले होते. त्यातील काही जण आता भाजीविक्रीमध्येच व्यवसायात स्थिर झाले आहेत. तर अनेक जण नव्याने भंगार गोळा करण्याच्या व्यवसायात उतरले आहेत. रद्दीचे दर वगळता अन्य सर्व दरांमध्ये घसरण आहे. त्यातही प्लॅस्टिक पुनप्र्रकियेसाठी फारसे जात नसल्याने त्याचे दरही कमी होत आहेत. कचरा वेचकांची संख्या मात्र तुलनेने स्थिर आहे. महापालिकेचे कचरा व्यवस्थापन प्रमख नंदकुमार भोंगे म्हणाले,की टाळेबंदीनंतर भंगार खरेदीच्या व्यवसायातील तरुणांची संख्या वाढली आहे. पण ती फार जास्त नाही. टाळेबंदीमुळे या क्षेत्रावर परिणाम झाले आहेत. महिला कचरावेचकांची संख्या तुलनेने स्थिर आहे. भंगार खरेदी करणाऱ्या व्यक्तींची यादीही महापालिकेकडे आहे. पण गल्लोगल्ली भंगार खरेदी करणारे वाढले आहेत. या क्षेत्रातील मोठय़ा व्यापाऱ्यांना आता वस्तू सेवा कर लागू करण्यात आल्यानंतर भंगारचे दर तसे घसरलेलेच होते. कचरा वेचकाकडून भंगार खरेदी करताना भाव मागितले जातात. दर घसरलेले असतानाही भंगाराच्या क्षेत्रात मनुष्यबळ वाढले आहे.

काच, पत्रा आणि भंगार खरेदी करणाऱ्या आणि वेचकांच्या क्षेत्रात काम करणारे सुभाष लोमटे म्हणाले, की टाळेबंदीच्या काळात मोलककरणींची कामे सुटली. परिणामी त्यांनी भाजी विक्रीचे व्यावसाय केले. त्यानंतर तरुण मुलांच्या हाताला शहरात काही कामच नाही. ग्रामीण भागात किमान रोजगार हमीवर तरी जाता येईल. पण येथे ती सोय नाही. परिणामी गल्लोगल्ली सकाळच्या सत्रात तरुण मुले भंगार गोळा करण्याच्या कामात आले आहेत.