औरंगाबाद : मराठवाडय़ाच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवर लिखाण करत या भागातील व्यथा आणि वेदनांना पत्रकारितेच्या माध्यमातून सामोरे आणणारे ज्येष्ठ पत्रकार बा. न. मग्गीरवार (वय ८९) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.  दैनिक लोकसत्तामध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. औरंगाबादसह देशाच्या राजधानीतही पत्रकारिता करणाऱ्या बा. न. मग्गीरवार यांचा विविध आंदोलनांशी संबंध होता. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण माहीत असणारे आणि त्यांच्या वाटचालीचे अर्धशतकाचे ते साक्षीदार होते. मूळ हिंगोलीचे असणारे बा. न. मग्गीरवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. १९५५ ते १९५८ या काळात गोवा मुक्ती आंदोलनात जगन्नाथ जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सत्याग्रही म्हणून सहभाग नोंदवला होता. त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. विविध दैनिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वीकारली होती. विधिमंडळ अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी त्यांना औरंगाबादहून मुंबईला आवर्जून बोलावले जात. या काळात त्यांनी आमदार निवासातील गटारी अमावास्येचे वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली होती. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे राजकारणातील अंदाज चुकत नसत. त्यांनी लिहिलेल्या वार्ताकनामुळे बऱ्याचदा काँग्रेस नेत्यांची झोप उडाली होती. मराठवाडा विकास आंदोलनात त्यांनी काही काळ काम केले होते. दिल्लीत प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या अनुषंगाने लिहिलेली वार्तापत्रे गाजली होती. ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी निवृत्तीपर्यंत काम पाहिले. विश्लेषण क्षमता आणि अफाट वाचन यामुळे त्यांची वार्ताकने आणि वार्तापत्रे गाजली. मग्गीरवार यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दुपारी पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.