दरवाढीला आळा घालण्यासाठी साठेबाजीवर विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत १ हजार २०० क्विंटल डाळी, तर १२ हजार क्विंटल साठा केलेले सोयाबीन जप्त करण्यात आले. तब्बल ७ कोटींच्या धान्यसाठय़ाला लगाम घालण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा केला जात आहे. तूरडाळीचे दर वाढल्याने केलेल्या या कारवाईत साठेबाजीत हरभऱ्याच्या डाळीची अधिक साठवणूक केल्याचे दिसून आले.
तुरीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले. मराठवाडय़ात पुरवठा विभागाच्या १९७ पथकांनी तब्बल १ हजार ३३५ ठिकाणी साठय़ांची तपासणी केली. तपासणीत तूरडाळीचा साठा कमी असल्याचे दिसून आले. एक हजार क्विंटल हरभराडाळ, ४७ क्विंटल तूरडाळ व ५० क्विंटल मूगडाळीचा अधिक साठा असल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्यात साखर व खाद्यतेलाचा साठाही अधिक असल्याचे, तर परभणी व नांदेड जिल्ह्यांत सोयाबीनचा साठा अधिक असल्याचे दिसून आले. परभणी जिल्ह्यात ८ हजार क्विंटल व नांदेड जिल्ह्यात ४ हजार क्विंटल साठा अतिरिक्त असल्याचे दिसून आले. हा साठा पुरवठा विभागाने जप्त केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.