News Flash

मागणी एक मात्र पुरवठा भलताच!

टंचाई ‘रेमडेसिविर’ची, औषधांचा धोशा ‘हेपेटायटिस’चा

टंचाई ‘रेमडेसिविर’ची, औषधांचा धोशा ‘हेपेटायटिस’चा

औरंगाबाद : गंभीर रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) रेमडेसिविर या इंजेक्शनची तीव्र टंचाई असून ते उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घाटी प्रशासनाने आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे केली आहे. ज्या औषधांची मागणी ते न देता उपसंचालक कार्यालयाने हेपेटायटिसची औषधे आणि संच घेऊन जा, असा धोशा घाटी प्रशासनाकडे लावला आहे. रुग्णालयात कोविड १९ चे रुग्ण अधिक असून इतर रुग्णांची संख्या कमी आहे. तरीही आवश्यक औषधांऐवजी तूर्त गरज नसणारी औषधे पुरवली जात आहेत. हेपिटायटिसची आवश्यकता नाही, रेमडेसिविरची गरज आहे, असे रुग्णालय प्रशासनाने उपसंचालक कार्यालयाला लेखी कळविले आहे.

शुक्रवारी जेमतेम पुरेल एवढाच रेमडेसिविर या इंजेक्शन्सचा साठा शहरात उपलब्ध होता. ‘दिवसभरात शहरात सरासरी हजार इंजेक्शन्स येतात आणि ते त्याच दिवशी संपतात. त्यामुळे रेमडेसिविरची टंचाई आहे, असे प्रशासनातील वरिष्ठांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. ज्यांचा करोना संसर्गातील गुणांक १० पेक्षा अधिक वेगाने वाढत जातो, अशा रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असते. घाटी रुग्णालयात अशा इंजेक्शन्सची नितांत आवश्यकता आहे. मात्र, ते इंजेक्शन न पुरवता दुसरीच औषधे घेऊन जा, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात भेट दिल्यानंतर त्यांच्यासमोरही रेमडेसिविर इंजेक्शनचे गाऱ्हाणे प्रशासनाने मांडले होते.

रुग्णांची गरज आणि तुटवडा या अनुषंगाने त्यांनी आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शुक्रवारी ३०० इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली. त्यामुळे काही अंशी प्रश्न निकाली निघाला होता. मात्र, दररोजच्या टंचाईवर उत्तर शोधले नाही तर गंभीर रुग्णांची स्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असेही डॉक्टर सांगत आहेत.

ग्रामीण भागातील काही उपजिल्हा रुग्णालयांना भेटी दिल्या, तेव्हा वैजापूर येथील रुग्णालयात दोन व्हेटिंलेटर विनावापर पडून असल्याचे दिसून आले. या रुग्णालयात दोन भूलतज्ज्ञ होते. पण एमडी मेडेसिनचा तज्ज्ञ नव्हता. जेथे गरज आहे तेथे यंत्र नाहीत आणि जेथे वापर होत नाही तेथे ते आहेत, हे चित्र फारसे चांगले नाही. त्यामुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर या बाबी घातल्यानंतर त्यात बदल झाले. पण योग्य नियोजनाची गरज आहे.

 – सतीश चव्हाण, आमदार पदवीधर मतदार संघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:09 am

Web Title: severe shortage of remdesivir injections in government medical college and hospital zws 70
Next Stories
1 वाहतूक व्यवसाय पुन्हा घसरणीला
2 गृहविलगीकरणातील रुग्णांवर शिक्षकांची नजर
3 आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण
Just Now!
X