‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष, सोबत संबळ, तुतारी, नगारा, झांजा असा निनाद. हजारो महिलांच्या डोक्यावर जलकुंभ, अशा वातावरणात तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्रातील जलयात्रा उत्सव सोमवारी पार पडला.
जलयात्रेचे यजमान महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते सोमवारी सकाळी पापनाश येथील इंद्रायणी देवीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पापनाश तीर्थातील जलाचे पूजन झाले. महंतांनी प्रारंभी नऊ जलकुंभ, देवीची प्रतिमा, मुख्य जलकुंभाची विधिवत पूजा केली. पूजाविधीनंतर रथावर देवीची प्रतिमा व कुंभ ठेवून जलयात्रेस प्रारंभ करण्यात आला. बलगाडीत चौघडा, दोन घोडय़ांवर पताका घेत तुतारीवादक, वारूवाले, गोंधळी, धनगरी पथक, बॅन्ड पथक, आराधींसह हजारो महिला व कुमारिका डोक्यावर जलकलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. जलयात्रा मार्गावर पापनाश रोड, शिवाजी चौक, भवानी रोड व महाद्वार चौक या रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. प्रक्षाळ मंडळाचे सदस्य व पुजारी मंडळाचे पदाधिकारी फेटे घालून व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
शिवाजी चौक, भवानी रोड या ठिकाणी कवडय़ाच्या माळा घालून, झांज वाजवत आराधी महिला देवीची गाणी म्हणत फेर धरत होत्या. तर सहभागी युवक ताल धरून नृत्य करीत होते. पोतराज आपल्या अंगावर चाबकाने फटके मारून घेत होते. काही महिला फुगडी, िपगा इत्यादी पारंपरिक कला सादर करीत होत्या. विशेष म्हणजे तृतीय पंथीयांनीही यात सहभाग घेतला. वाद्य, नृत्य, जयघोष, बॅन्ड पथकाची भक्तिगीते यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय व आनंदी झाले होते. जलयात्रा देवीच्या मंदिरासमोर पोहोचताच सहभागी महिलांनी जलकलशातील जल देवीच्या सिंहासनावर अर्पण केले व देवीचा जयघोष करीत देवीचे दर्शन घेतले. यात्रेत महंत तुकोजी बुवा यांच्याबरोबर महंत हमरोजी बुवा, भोपे पुजारी समाधान परमेश्वर, संजय परमेश्वर, उपाध्ये पुजारी, अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, बंडोपंत पाठक व मंदिर प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 1:29 am