शंकरराव चव्हाण यांचा नांदेड येथील पुतळा उद्घाटनाविना झाकून ठेवला असताना पठण येथील पुतळा अनावरणास मात्र शुक्रवारचा (दि. १६) मुहूर्त सापडला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुतळय़ाचे अनावरण होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान समन्यायी पाणीवाटपाचा निर्णयही होण्याची शक्यता आहे. वरील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी चार प्रकारच्या धोरणांपकी कोणते धोरण लागू पडते, यावर गुरुवारी (दि. १५) बैठकीत चर्चा होणार आहे.
जायकवाडी जलाशयात सध्या ६ टक्के पाणीसाठा आहे. वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे स्थायी आदेश असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळच्या कार्यकारी संचालकांनी घेतला आहे. या धरणात पाणी येत नसल्याची अनेक कारणे आहेत. नगर व नाशिक जिल्ह्यांत बांधलेली अतिरिक्त धरणे त्यास कारणीभूत आहेत, तर समन्यायी पाणीवाटपाच्या १२(६) (ग) या कलमान्वये न्यायालयात वादही सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर शंकरराव चव्हाण यांच्या पठण येथील पुतळा अनावरणास राजकीय संदर्भही लावले जात आहेत. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या भूमिकेचे हे सरकार आहे, असा त्याचा सरळ अर्थ लावला जात आहे. या धरणाचे पूर्ण श्रेय शंकरराव चव्हाण यांचेच असल्याने या धरणाचे अडवलेले पाणी सोडण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचा संदेश दिला जात आहे.