01 April 2020

News Flash

..तर बाळासाहेबांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते

शरद पवार यांचा महापालिकेला टोला

एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

शरद पवार यांचा महापालिकेला टोला

औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद महापालिकेला सुनावले. सोबतच आता पर्यावरण सांभाळून असे स्मारक उभे करण्याची जबाबदारी अंकुशराव कदम यांच्यासारख्या पर्यावरणस्नेही व्यक्तीच्या महात्मा गांधी मिशनला द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठवाडा या प्रदेशाच्या मागासलेपणाची चर्चा होते. मात्र, हा शब्द आपल्याला मान्य नाही. मराठवाडय़ातील तरुण पिढी कर्तृत्ववान आहे. परदेशात जेव्हा अनेक भारतीय भेटतात तेव्हा ते मराठवाडय़ातील निघतात. फक्त या भागातील व्यक्तींना महाराष्ट्राने न्याय देण्याची जी गरज आहे, तो दिला नाही. विधिमंडळात संसदीय आयुधे वापरून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडताना उत्तम भाषण करणारा माणूस कोण असे विचाराल तर भाई उद्धवराव पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. मात्र, त्यांच्या बाबतीत योग्य न्याय होऊ शकला नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात सुरुवातीला अंकुशराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना त्यांच्या पर्यावरण प्रेमाचा उल्लेख त्यांचे बंधू कमलकिशोर कदम यांनी केला. ‘एमजीएम’ परिसराचा विकास करताना अनेक वर्षे जपलेली झाडे महापालिकेने तोडली. कोणत्या तरी महापुरुषाचा पुतळा उभा करण्यासाठी चारशे झाडे तोडल्याचे अंकुशरावांना दु:ख झाल्याचे ते म्हणाले. खरे तर लावलेल्या झाडांपैकी सर्वात उंच झाडास महापुरुषाचे नाव देऊनही स्मृतिस्थळ करता आले असते तर बरे झाले असते, पण तेवढी समज आपल्या समाजात आलेली नाही हे दुर्दैव, अशा शब्दात कमलकिशोर कदम यांनी त्यांची खंत बोलून दाखविली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विक्रम काळे यांनी केले, तर मानपत्राचे वाचन नीलेश राऊत यांनी केले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.

‘एमजीएम’च्या जमिनीसाठी पवारांची आमराई गहाण

१९८२ च्या सुमारास औरंगाबाद येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे कमलकिशोर कदम यांनी ठरविले. तेव्हा दहा लाख रुपयांची गरज होती. ही रक्कम प्रयत्न करूनही जमविणे शक्य नसल्याने अंकुशराव कदम यांनी शरद पवार यांच्या कानावर अडचण घालण्याची विनंती कमलकिशोर कदम यांना केली. बँक गॅरंटी मिळावी म्हणून ते सातत्याने तेच बोलत होते. महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडे सर्वाना घेऊन शरद पवार गेले. काही वेळात बँक गॅरंटीचे पत्र मिळाले. तेव्हा असे कसे घडले, अशी चौकशी केली असता तेव्हा कळाले, शरद पवार यांनी आपल्या स्वत:च्या जमिनीची कागदपत्रे बँक गॅरंटीसाठी दिली होती.

नृत्य शिकणारा माणूस काहीही करू शकतो

अंकुशराव कदम यांचा गौरव करताना चित्रकला, शिल्पकला यांना त्यांनी प्रोत्साहन कसे दिले याची उदाहरणे देण्यात आली. अंकुशराव यांनी शंकरबापू आपेगावकर यांच्याकडून पखवाज वादनही शिकले असल्याची आठवण सांगण्यात आली. कथक नृत्याच्या क्षेत्रातील नामवंत पार्वती दत्ता यांच्यामार्फत त्यांनी ‘एमजीएम’मध्ये ‘महागामी’  नृत्य प्रशिक्षणाची अकादमी सुरू केली. त्याच्या कलागुणांचा धागा पकडून शरद पवार यांनी त्यांचे मित्र खासदार श्रीनिवास पाटील यांनीही कथक नृत्यशैली का आणि कशी शिकली, याचे रसभरीत वर्णन केले. गडी पाटील पण एका मुलीने आव्हान दिल्यानंतर ते ही कला शिकले. पुढे ज्या मुलीने त्यांना आव्हान दिले होते तिच्याबरोबर परदेशात एक सादरीकरण करून पारितोषिक मिळविले. आता अंकुशराव ही कला का शिकले, हे मात्र माहीत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 1:39 am

Web Title: sharad pawar aurangabad municipal corporation bal thackeray zws 70
टॅग Sharad Pawar
Next Stories
1 CAA Protest : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध : मराठवाडय़ात मोर्चे, बंद, दगडफेक, जाळपोळही
2 #CAA: “या देशात फक्त दोनच लोकांना अक्कल आहे, बाकीचे बिनडोक आहेत का?”
3 विद्यापीठात अभाविप-आंबेडकरवादी संघटना आमने-सामने
Just Now!
X