डिसेंबर किंवा फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा संकल्प केला आहे. यासाठी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये मेळावा होणार आहे. एका बाजूला विजयी संकल्पाची घोषणा केली जात होती तेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जयदत्त क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीला गेले होते. त्यामुळे ‘त्या’ आरतीची मराठवाडय़ात दिवसभर चर्चा होती.

१ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बीड मुक्कामी थांबणार आहेत. ३० सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

बीडमध्ये होणाऱ्या विजयी संकल्प मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक तालुक्यात पक्षाचे मेळावे घेणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पिके वाया गेली आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असला तरी  प्रशासन मात्र कुठलीच कार्यवाही करत नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनही दिले. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

इंधन दरवाढ, महागाई या प्रश्नावरही राष्ट्रवादी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी लढाई सुरू झाली असून त्याची सुरुवात बीडमधील मेळाव्यातून करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

सूतगिरणीने कर्ज घेतले त्या वेळी संचालकही नव्हतो

संत जगमित्र नागा सूतगिरणीच्या कर्ज प्रकरणात मालमत्तेवर र्निबध आणण्याची झालेली कारवाई दबावापोटी करण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. राज्यातील कोणत्याही न्यायालयाने किंवा पोलीस अधीक्षकांनी अशा स्वरुपाची कारवाई कोठेच केल्याचे ऐकिवात नसल्याचे सांगून पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत, हे सर्वश्रुत असल्याचे ते म्हणाले. सूतगिरणीच्या प्रकरणात १८  संचालकांवर गुन्हे दाखल झालेले असताना केवळ सातच संचालकांच्या मालमत्तेवर  टाच हा कुठला न्याय, असा सवाल त्यांनी विचारला. धनंजय मुंडे संचालक आहे म्हणूनच कारवाई झाल्याचे सांगितले जात असले तरी कर्ज घेताना आपण संचालक नव्हतो. २००६ मध्ये संचालक झाल्याचे मुंडे म्हणाले.

क्षीरसागरांविषयी सारवासारव, तर धसांवर टीका

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी गणेशाची आरती केल्याच्या संदर्भात धनंजय मुंडे म्हणाले,की  नेते, पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या पलीकडे संबंध असतात. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. आपण एकमेकांच्या घरी प्रसादाला जातो, हा त्यातीलच एक भाग असावा, असे म्हणत त्यांनी फार काही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. तर आमदार सुरेश धस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवरुन धनंजय मुंडेंनी त्यांना फटकारले. विरोधी पक्षनेत्याच्या राजीनाम्याची मागणी करण्याची नवीनच पद्धत सुरू झाल्याचे सांगून नव्याने भाजपात गेलेल्यांना स्वत:चे काम दाखवण्यासाठी मागणी करावीच लागेल, असे ते म्हणाले.