ना मोदींवर टीका ना फडणवीसांना केले लक्ष्य

राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडय़ात हल्लाबोल यात्रेत २७ सभा घेतल्या. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि जमलेली गर्दी यामुळे पक्षीय पातळीवर दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये काहीशी चेतना निर्माण करण्याचे काम झाले. कार्यकर्त्यांसमोर दुसऱ्या फळीतील नेत्यांची जोरदारपणे भाषणेही झाली, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मात्र त्यांच्या भाषणातून कमालीचे सावध असल्याचे दिसून आले. त्यांनी भाषणात ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव घेऊन टीका केली ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर फारसे भाष्य केले. ‘शेती उद्ध्वस्त होते आहे’, अशी चिंता त्यांनी त्यांच्या भाषणातून मांडली. सुरुवातीच्या काळात नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करणारे शरद पवार नोटाबंदीमुळे लाभ झाला नाही, असे जाहीरपणे सांगू लागले आहेत. त्यांनी धार्मिक दंगलीवरही भाष्य केले खरे. पण त्यांच्या भाषणात ना अखलाखचे हत्याकांड होते ना, ना गुजरात दंगलीचे उल्लेख. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेल्या आक्रमक मांडणीला तसे टोकदार रूप न देता त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सावध भूमिका मांडली.

मराठवाडय़ात शरद पवार यांची भाषणे तशी तिरकस शैलीतील असतात. एखादा सणसणीत टोमणा तरी ते मारतातच. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने पवार यांनी केलेले भाषण तसे व्याख्यात्याच्या बाजाचे होते. सरकारने दिलेली आश्वासने ‘लबाडाचे आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरे नाही’ या म्हणीचा उपयोग त्यांनी केला खरा, पण अनेक विषयांना त्यांनी स्पर्शही केला नाही. अर्थसंकल्पानंतरच्या सभेत ते शेतीमध्ये सरकारने केलेली गुंतवणूक कशी फोल ठरू शकेल, हे सांगू शकले असते. हमीभावाचा प्रश्न सोडविताना उत्पादन खर्चच सरकार कमी दाखवेल आणि मग दीडपट भाव दिल्याचे सांगेल, असे त्यांचे वक्तव्य होते. पण उत्पादन खर्च कमी दाखविण्याची पद्धत ही पूर्वापार अशीच आहे. कृषी विद्यापीठे अनेक प्रकारचे खर्च गृहीतच धरत नाही, असा शेतकरी संघटनेचा आरोप ते कृषीमंत्री असल्याच्या काळापासूनचा आहे. त्यामुळे उत्पादन काढताना बाजारभाव गृहीत धरून हमीभाव काढले जात नाहीत, हे आता शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेले आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्नही गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. पण हे सर्व विषय कृषी मंत्रालयाशी निगडित होते. कापसावरील बोंडअळीचा उल्लेख पवार यांच्या भाषणात होता. कापसाची नुकसानभरपाई कशी द्यावी, याचा कायदा राज्यात करण्यात आलेला आहे. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार होते. त्या आदेशाच्या पलीकडे जाऊन सरकाने मदत करावी का, यावरही त्यांनी भाष्य केले नाही. केवळ कापूस मदतीच्या घोषणेतून दमडाही मिळणार नाही, असे ते म्हणाले. शेती समस्येभोवती केंद्रित असलेल्या पवार यांच्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांवर ते काहीच बोलले नाहीत. सत्ताधारी मंडळी कायद्याचा बडगा दाखवत आहेत, असे ते म्हणाले खरे. पण त्याला आधार दुसऱ्या फळीतील नेत्याच्या भाषणाचा होता. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाषणे आक्रमक होती. स्मारकांसाठी निधी देत नाहीत, असे सांगत, खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे ११ फेब्रुवारी येथे मौनव्रत पाळून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. पण हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाही तर वैयक्तिक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारविरोधी आंदोलन असेल तर ते पक्षाच्या वतीने का नाही, याचा तपशील त्यांच्या भाषणात नव्हता. सभ्य भाषेत भाषणातून व्यक्त होताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यांनी माननीय असाच केला. त्याला कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यांनी विरोधाची पातळी तशी खाली येऊ दिली नाही, हे उपस्थितांच्या लक्षात आले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे भाषण मात्र तुलनेने आक्रमक होते. कर्जमाफीच्या वेळी पत्नीसह अर्ज भरायला या, असा फडणवीस सरकारचा नियम कशासाठी, असा सवाल करत त्यांनी आम्हाला जोडीने काय सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद घेण्यासाठी बोलावले होते काय, असाही प्रश्न निर्माण केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फडणवीस असा उल्लेख करणे, तसेच ते कसे मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, असे सांगण्यासाठी त्यांना ‘ चीट मिनिस्टर’ अशी पदवी चिकटविणे, हे उल्लेख आक्रमकता दर्शविणारे होते. अजित पवार गेल्या काही दिवसांत आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादच्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपातही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. किती धरणे, बॅरेजेस किंवा साठवण तलाव तुम्ही केले, असा सवाल केला. पण एरवी तिरकसपणे किंवा टोमणे मारत भाषण रंगवणारे शरद पवार हल्लाबोल आंदोलनात काहीसे सावध बोलताना दिसून आले.

गेल्या काही वर्षांत सत्ताधारी नेत्याबरोबर व्यासपीठावरून दिसणारे शरद पवार पक्षाच्या व्यासपीठावरून थेट पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे वाभाडे काढतील, अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना होती. पण तसे घडले नाही.

काय घडले?

जयदत्त क्षीरसागरसारखी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते मंडळी भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत होते. बीडमध्ये हल्लाबोल यात्रेमध्ये न दिसणारे क्षीरसागर पवारांच्या सभेच्या वेळी व्यासपीठावर दिसत होते. विदर्भ आणि मराठवाडय़ातील बहुतांश नेत्यांनी या हल्लाबोल यात्रेला हजेरी लावली. दिलीप वळसे पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, या ज्येष्ठांसह यांची कार्यक्रमाला हजेरी होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अवसान गळालेले नाही, असा संदेश प्रामुख्याने कार्यकर्त्यांमध्ये गेला. मराठवाडय़ातील प्रत्येक नेत्याने या कार्यक्रमासाठी औरंगाबादला कार्यकर्ते आणले होते.