पुरोगाम्यांनी पूर्ण पुरोगामी व्हावे, असे सांगत सावरकरांचा अभ्यास करतो म्हणून प्रतिगामी ठरविणे हा एक प्रकारचा दहशतवादच असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी केला. प्रतिगामी हा वैचारिक विश्वात शिवीपेक्षाही वाईट शब्द आहे. सावकरांनी लिहिलेली वा त्यांच्यावर लिहिलेली कोणतीही पुस्तके न वाचता त्यांना बहिष्कृ त करण्यात आले.
शुभम साहित्य व किंकारा फाऊं डेशनच्या वतीने मोरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना पुरोगामी दहशतवाद या शब्दावरून सुरू असणाऱ्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, लोकशाहीविरोधी, सनातनी, बुरसटलेला, मागासलेला अशा अर्थाने प्रतिगामी शब्द वापरला जातो. विश्व साहित्य संमेलनाच्या निवडीपूर्वी हिंदुत्ववादी व प्रतिगामी असे शब्द वापरून एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्या वृत्तातील मजकुराचे खंडन करण्यासाठी साहित्य संमेलनात भूमिका विशद केली. त्यामुळे वाद होईल, असे अजिबात वाटले नव्हते. कारण भाषणातील ४५ पानांपैकी २३ पानांमध्ये शेतकरी, त्यांच्या समस्या, जागतिकीकरण यावर भाष्य केले होते. मात्र, भाषण पूर्ण न वाचताच अनेकांनी टीका केल्याचे सांगत कोणत्या अर्थाने मी प्रतिगामी असा सवाल त्यांनी केला. हिंदुत्व आणि सावरकरांवर बोलतो म्हणजे प्रतिगामी म्हणणे दहशतवादच असल्याचा उल्लेख त्यांनी केला. सावरकरांच्या मतांशी जुळणारेच काम नरेंद्र दाभोलकर करत होते. त्यांच्याबरोबर अनेकदा चर्चा होत असत, असे सांगत सध्या सुरू असणाऱ्या साहित्यिकांच्या हत्यासत्राचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
सावरकरांच्या काळात प्रखर बुद्धिवाद मांडला जात होता. तेव्हादेखील कोणाची हत्या झाली नाही. अलीकडच्या काळातील नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या निंद्य असल्याचे मत विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या हत्येच्या निषेधाचा उल्लेख केला नसल्याचा आरोप सूचकपणे केला जातो, तो पूर्णत: चुकीचा असून हमीद दाभोलकर यांना जेवढे दु:ख झाले असेल त्यापेक्षा आमचे नक्कीच कमी नाही, असे सांगत त्यांनी या हत्येचा निषेध नोंदविला. सध्याच्या वातावरणात केवळ पुरोगामी व्यक्तींना एकच सांगावे असे वाटते की, त्यांनी पूर्ण पुरोगामी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले.