05 June 2020

News Flash

शिवसेनेकडून २४४ जोडप्यांचे थाटामाटात विवाह

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करताना जात-धर्माच्या पलीकडे जाऊन शिवसेना विचार करते आणि हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४४ दाम्पत्याच्या

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करताना जात-धर्माच्या पलीकडे जाऊन शिवसेना विचार करते आणि हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४४ दाम्पत्याच्या सामुदायिक विवाहसोहळ्यास हजेरी लावली. सामुदायिक विवाहामुळे पाण्याची बचत होते आणि त्याचबरोबर हुंडा प्रथेलाही आळा घालता येऊ शकतो, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्यावतीने शहरातील अयोध्यानगरी भागात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाहसोहळा थाटामाटात केला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री रामदास कदम, खासदार राजकुमार धूत यांची उपस्थिती होती. खासदार चंद्रकांत खैरे हे या विवाहसोहळ्याचे संयोजक होते.
या सोहळ्यासाठीची लगीनघाई गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू होती. शनिवारी थाटामाटात शेतकरी कुटुंबीयांतील मुला-मुलींचे सामुदायिक विवाह लावण्यात आले. २४४ वधू-वरांपैकी ४२ बौद्ध समाजातील, ८ मुस्लिम समाजातील, तर १९५ हिंदू समाजातील जोडप्यांचा विवाह त्या-त्या धर्मातील परंपरेनुसार लावण्यात आला. हा धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, संकटकाळामध्ये मदत करताना जात-धर्म असा विचार करायचा नसतो आणि हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे. राजकारण नेहमीच चालत असते. पण असे उपक्रम आवश्यक असतात, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अशा उपक्रमांची आवश्यकता प्रतिपादित करताना ते म्हणाले की, मराठवाडय़ातील सर्व गावांमध्ये दुष्काळ उपाययोजनांसाठी प्रशासकीय स्तरावरून चांगले प्रयत्न होत आहेत. मात्र, अशा सामुदायिक विवाहसोहळ्यामुळे पाण्याची बचत निश्चितपणे होतेच. त्याचबरोबर हुंडाबंदीसही आळा बसू शकतो.
शिवसेनेकडून नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. मातोश्रीहून मणी मंगळसूत्र पाठविण्यात आले होते. तर नवरदेवासाठी सफारी आणि नवरीसाठी पैठणी आणि हळदीची साडी देण्यात आली होती. संसारोपयोगी साहित्यात कपाट, पलंग, गादी, पंखा, घडय़ाळ, कुकर आदी वस्तू देण्यात आल्या.
अयोध्यानगरीत सकाळपासून ‘लगीनघाई’ सुरू होती. मुहुर्तापूर्वी सामुदायिक विवाहासाठी नोंदविल्या गेलेल्या नावांचा पुकारा होत होता. ज्या-त्या नवऱ्यासमोर ठरलेली नवरी उभी करण्यापासून ते वऱ्हाडांची हरवलेली लहान मुले, त्यांच्या पालकांपर्यंत पोचविण्यासाठी शिवसैनिकांना काम करावे लागत होते. विवाहप्रसंगी होणारी सगळी लगीनघाई शिवसैनिक आणि पदाधिकारी शिस्तीने करीत होते. ५० हजारांहून अधिक आलेल्या वऱ्हाडींचा पाहुणचारही करण्यात आला. बुंदी आणि बर्फीसह जेवणाचा मेनूही वऱ्हाडातील नातेवाईकांना खूश करून टाकणारा होता. पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्लास्टिक पाऊचमधून पाणी दिले जात होते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 1:10 am

Web Title: shiv sena 244 married couples pomp
Next Stories
1 शिवसेना-भाजपकडून मराठवाडय़ात आज, उद्या सामुदायिक विवाह सोहळे
2 सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावांचा आमीर खानकडून आढावा
3 खडसे यांचा हेलिकॉप्टर दौरा अन् १० हजार लिटर पाण्याची नासाडी!
Just Now!
X