शहरात इसिसशी संपर्कात असलेल्या आरोपावरून दोन संशयितांना अटक झाल्यानंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे या विषयावर अद्यापही मौनच आहे. अशा विषयात शिवसेनेची भूमिका नेहमीप्रमाणेच असली तरीही जिल्ह्यात स्वबळाचा दावा करणाऱ्या भाजपला या प्रश्नावर नेमके काय वाटते, हे मात्र कळू शकले नाही. उठसूठ कोणत्याही उपक्रमांच्या बातम्या देणाऱ्या या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजून तरी या विषयावर आपली भूमिका मांडलेली नाही.

परभणीत पंधरा दिवसांपूर्वी इसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून नासेरबीन चाऊस या संशयितास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शाहीद खान या दुसऱ्या सशंयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली. अशा विषयात शिवसेनेची काय भूमिका असणार हे सर्वपरिचित असले तरीही शिवसेनेच्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपापले निवेदन दिले. मराठवाडय़ात शंभर बेपत्ता तरुण असून ते दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या भूमिकेवरूनही पुढे वाद निर्माण झाला. आमदार  पाटील यांच्याकडे तशी माहिती असेल तर त्यांनी यादीच सादर करावी, अशी भूमिका शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी घेतली.

माध्यमांमध्येही आमदार पाटलांची ही भूमिका चच्रेत राहिली. त्यानंतर खासदार संजय जाधव यांनीही इसीसच्या संपर्कात असलेल्या संशयितांच्या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घ्या, असेही प्रसिद्धिपत्रक खासदार जाधव यांनी दिले. शिवसेनेच्या या लोकप्रतिनिधींच्या भूमिका माध्यमाद्वारे जनतेसमोर आल्या. या संवेदनशील विषयावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांना, जबाबदार पदाधिकाऱ्यांना काय वाटते, हे मात्र जनतेसमोर आले नाही.

नुकतेच परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. दोन ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरातल्या प्रत्येक सत्रात कोण काय बोलले, याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली. एरवीही भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांची माहिती दिली जाते. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष स्वतंत्रपणे प्रसिद्धिपत्रक काढून आपल्या उपक्रमाबाबत माध्यमांना कळवत असतात. मात्र, या विषयावर अजून तरी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोंड उघडलेले नाही.