बीडमध्ये आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

भाजपमध्ये मेगा भरती सुरू असली, तरी शिवसेनेत मात्र गुणवत्तेवर आधारित भरती होत असल्याचे सांगून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. निवडणुकानंतर सर्व पक्ष लोकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवतात. मात्र शिवसेना हा एकमेव पक्ष बारा महिने आणि चोवीस तास जनतेसाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

बीड येथे रविवारी बसस्थानकाच्या पुनर्बाधणी भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहनमंत्री दिवाकर रावते होते. मंचावर रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा असून दुष्काळ, प्रदूषण, बेरोजगारी आणि कर्जमुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तुम्ही साथ द्या असे आवाहन ठाकरे यांनी केले.

शिवसेना-भाजपमध्ये सध्या मेगाभरती सुरू असल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये मेगाभरती सुरू असली, तरी शिवसेनेत मात्र गुणवत्तेवर आधारितच भरती असल्याचे स्पष्ट करून आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यतील सर्व विधान परिषद सदस्यांची नावे होती. मात्र कार्यक्रमस्थळी पालकमंत्र्यांसह खासदार, भाजपचे लोकप्रतिनिधी आणि विधान परिषद सदस्यांनी पाठ फिरवली. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीत झालेला हा पहिलाच शासकीय कार्यक्रम ठरला.