सत्ताधाऱ्यांवर उमेदवारांना पुरस्कृत करण्याची नामुष्की

निवडून येण्याच्या गुणवत्तेवर चर्चा होऊन निर्णय घेण्याची शिवसेनेची इच्छा नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती होऊ शकली नसल्याने रिपाइं, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांसोबत महायुती केल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी शनिवारी जाहीर केले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने केवळ ३१ ठिकाणी तर रिपाइंने १० ठिकाणी उमेदवार दिले असून नऊ जागांवर अन्य उमेदवारांना पुरस्कृत करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली आहे.

बीडसह गेवराई, माजलगाव, धारूर, अंबाजोगाई, परळी या सहा नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना युती होणार असे वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र स्थानिक ठिकाणी केवळ परळी आणि अंबाजोगाई या दोन ठिकाणीच युती झाली असून चार नगरपालिकांच्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढवणार आहेत. भाजप नेत्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उमेदवार देऊ नका, असे सांगूनही बीडमध्ये जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे. अन्य चार ठिकाणी शिवसेना सहकार्याची भूमिका घेत नसून केवळ बीडसाठी हट्ट करत असल्याचे सांगून निवडून येण्याच्या गुणवत्तेवर चर्चा होऊन निर्णय घेण्याची शिवसेनेची इच्छा नसल्यामुळे युती होऊ शकली नसल्याचे रमेश पोकळे यांनी स्पष्ट केले आहे.

बीडमध्ये भाजपने रिपाइं, रासप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांना सोबत घेऊन महायुतीची बांधणी केली आहे. भाजपने ३१ ठिकाणी तर रिपाइंने १० ठिकाणी उमेदवार दिले असून ९ ठिकाणी इतर उमेदवारांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच बीडच्या जागेवरून सेना-भाजपमध्ये ओढाताण सुरू होती. त्यामुळे परळी वगळता कोठेही युती करण्यात उभयतांना यश आले नव्हते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा मिनिट अगोदर अंबाजोगाईत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनुपमा कुलकर्णी यांनी माघार घेत त्या ठिकाणी युती केली. या दोन नगरपालिका वगळता बीड, गेवराई, माजलगाव, धारूर या ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.