औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची छुपी युती झाल्याचे चित्र दिसताच काँग्रेस व शिवसेनेतीलही एका गटामध्ये नाराजी पसरल्याचे दिसून आले. उघडपणे या नाराजीला काँग्रेस व शिवसेनेतील सदस्यांनी माध्यमांसमोर वाट मोकळी करून दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी शिवसेनेने धोका दिल्याची प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीरा शेळके यांच्या दालनात बोलताना महाजन यांनी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले असले तरी ते चिठ्ठीच्या आधारावर, असे सांगताना शिवसेनेतील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचेच सूचित केले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांना व काँग्रेसच्या उमेदवार मीरा शेळके यांना ४ जानेवारी रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत समान म्हणजे प्रत्येकी ३०-३० मते मिळाली होती. शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यानंतरही काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गटातील सहा सदस्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. सभापतिपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसचे श्रीराम महाजन यांना माघार घ्यावी लागली. आता काँग्रेसकडे जिल्हा परिषदेत केवळ अध्यक्षपद राहिले आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करत शिवसेनेत गेलेले किशोर बलांडे यांना सभापतिपद मिळाले असून एका सभापतिपदी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपची छुपी युतीच झाल्याचा संदेश काँग्रेस नेत्यांना मिळाला आहे. शिवसेनेचे आडगाव जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी थेट भाजप व शिवसेनेची युतीच झाल्याचे सांगताना आपल्यावर अन्याय झाला आहे, अशी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. शिवसेनेने काँग्रेसला फसवले आहे. संख्याबळामुळे मतदान सेनेच्या उमेदवारांना मिळाल्याने जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनीही नाराजीचा सूर आळवला.