पंकजा मुंडेना वगळून भाजप नेत्यांवर प्रहार

शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या ‘घोटाळेबाज भाजप’ या पुस्तिकेमध्ये महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. चिक्की घोटाळा असा उल्लेख तर पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर आहे. मात्र, त्याचा ना तपशील आहे ना मंत्री मुंडे यांचे छायाचित्र. बीड जिल्ह्यत शिवसेनेची ताकद कमी असणे, उद्धव ठाकरे यांनी मुंडे यांना बहीण मानलेले असणे, याची आठवण करून दिली जात आहे.

घोटाळेबाज भाजप नावाच्या पुस्तिकेच्या पहिल्या पानावर एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची छायाचित्रे ठसठशीतपणे शिवसेनेकडून प्रकाशित करण्यात आली आहेत.  पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाच्या घोटाळा यादीत ‘चिक्की’चा उल्लेख तर आहे. मात्र, त्याचा तपशील देण्याचे टाळले आहे. असेही अन्य घोटाळ्याचे तपशील वर्तमानपत्रातील कात्रणावरच अवलंबून आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांना शिवसेनेकडून पद्धतशीरपणे वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, खरे तर चिक्की घोटाळात क्लीन चिट देतानाच सरकारने ज्या सचिवांनी घोळ घातला, त्याचा खुलासा मान्य केला. चौकशी अशी केलीच नाही. त्यामुळे शंका आहे तशाच आहेत. पण या पुस्तिकेमध्ये शिवसेनेकडून तो का प्रकाशित करण्यात आला नाही. हे सांगता येणार नाही.’ सेनेकडून पंकजा मुंडे यांना पुस्तिकेतून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला होता. या जिल्ह्यत सेनेची तशी फारशी ताकदही नाही. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ती ताकद वाढली नाही.

शिवसेना आणि मुंडे यांचे नाते नेहमीच सलोख्याचे राहिले होते. १९९९ मध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी असताना मुंडे यांनी खो घातला होता, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली होती. तरीही शिवसेना आणि मुंडे यांच्यात कधी दुरावा निर्माण झाला नाही. भाजपमध्ये महाजन, मुंडे आणि शिवसेना यांच्यात नेहमीच चांगले संबंध होते.