08 March 2021

News Flash

निजामाच्या बापाचे राज्य!

शिवसेनेचा केंद्र सरकारवर थेट हल्ला

शेतकऱ्यांसाठी शिवसेना विशेष मोहीम राबविणार आहे.

शिवसेनेचा केंद्र सरकारवर थेट हल्ला
‘निजामाच्या बापाचे हे राज्य आहे’ असा घणाघात करीत शिवसेनेचे उपनेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन येथे टीका केली. ‘दिल्लीत विचारले, पंतप्रधान कोठे आहेत? यावर उत्तरात स्वित्झरलँड, फ्रान्स, जर्मनी अशा देशांची नावे समोर येतात. पंतप्रधानांनी मराठवाडय़ातील दुष्काळ पाहण्यास यावे, असे वारंवार सांगितले होते. ते जगभर फिरताहेत. निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये ४० सभा, तमिळनाडूत ३० सभा, तर ज्या केरळात भाजपला कुत्रेही विचारत नाही तेथे १०-२० सभा घेतल्या. मात्र, दुष्काळग्रस्तांसाठी पंतप्रधान एक दिवस तरी आले का, असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेने केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. परिस्थिती वाईट आहे. अच्छे दिन अजिबात आले नाहीत. पाच-पंचवीस लोकांना आले असतील. खडसेंनाही आले असतील. आता त्यांच्या मागे कोर्ट-कचेऱ्या सुरू होतील, तेव्हा त्यांनाही कळेल, अच्छे दिन म्हणजे काय या शब्दात राऊत यांनी केंद्र-राज्य सरकारवर हल्ला चढवला. ‘सामना’तील ‘बुडबुडे फुटू लागले’ या अग्रलेखाचा उल्लेख करीत त्यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. जो शिवसेनेच्या वाटेला आला, तो आडवा झाला. राजकारणातून बाहेर पडण्याची वेळ एकावर आली आणि दुसरा दाढी वाढवून तुरुंगात आहे, असे ते म्हणाले. दाढीचा रोख भुजबळांकडे अंगुलीनिर्देश करणारा होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘वाघाच्या जबडय़ात घालूनि हात, मोजितो दात’ या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील वक्तव्यालाही राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘वाघाच्या जबडय़ात ताकद नसते. पंज्यात असते. सुळे काय अस्वलासदेखील असतात. पंजे मारत मारतच शिवसेना मोठी झाली आहे,’ असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

निवडणुका झाल्या तर..
आज निवडणुका झाल्या तर राज्यात शिवसेनेच्या १८० जागा निवडून येतील. कारण बुडबुडे टिकत नसतात. हे कळून चुकले आहे. मराठवाडय़ाच्या जिवावर येत्या निवडणुकीत ३५ जागा जिंकू, असा दावा खासदार राऊत यांनी या वेळी केला. ही आकडेवारी आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकही आवर्जून सांगत आहेत. भाजपचे लोकही खासगीत हे मान्य करतात, असे सांगत भाजपच्या नेत्यांना ‘खासगी’त बोलायची सवय असल्याची कोपरखळीही राऊत यांनी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:58 am

Web Title: shiv sena comment on central government
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 करवसुलीवरून मनपा-पोलीस आयुक्तांवर खैरेंची आगपाखड!
2 परभणी बाजार समितीचे सभापती-सचिव अडचणीत
3 भीजपावसाने सगळा नूरच पालटला!
Just Now!
X