औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आमदार अंबादास दानवे यांच्यासह १५ ते १६ जणांविरुद्ध गर्दी जमवून कावड यात्रा काढल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तर जवाहननगर ठाण्यात भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यासह २० ते २१ जणांविरुद्ध सोमवारी शंखनाद आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सावे यांच्यासोबत भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रवीण घुगे यांच्यासह प्रमुख नेते, महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपकडून राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले होते. औरंगाबादेत गजानन महाराज मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी सहायक फौजदार ज्ञानेश्वर रामकृष्ण सोनार यांनी तक्रार दिली आहे. तर कावड यात्रा काढून पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार अंबादास दानवे, राजेंद्र दानवे, विश्वनाथ राजपत, किशोर नागरे आदींसह १५ ते १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी उपनिरीक्षक भगवान एकनाथ मुजगुले यांनी तक्रार दिली आहे.