संघटन बांधणीसाठी औरंगाबादमध्ये उपक्रम

महापालिकेच्या पातळीवर अनेक प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरणारी शिवसेना जिल्हय़ात वाढते कशी, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. उत्तर छोटय़ा उपक्रमांमध्ये दडले आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील पावणेतीनशे महादेव मंदिरांची यादी शिवसेनेने केली आहे. केवळ महादेव मंदिरच नाही, तर पंचक्रोशीतील महत्त्वाच्या मंदिरात महाआरती करायची आणि ‘हर हर महादेव’ म्हणायचे असे नवे अभियान सुरू केले जाणार आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी श्रावण महिन्यातील हा उपक्रम संघटन बांधणीसाठी अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा फारसा प्रभाव दिसत नसला तरी शिवसेनेला निवडणुकांमध्ये यश मिळते आहे. निवडणुका जवळ येत आहे असे लक्षात आले आणि शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला जिल्हय़ात वेग दिला. जानेवारी महिन्यात २१२ गावे आणि शहरातील सर्व वॉर्डामध्ये गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांच्या बैठका घेतल्या गेल्या. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांबरोबरही बैठका झाल्या. सरपंच, उपसरपंचाचे मेळावे झाले आणि त्यात सांगितले गेले केंद्र सरकारच्या योजनांचे अपयश. उज्ज्वला, मुद्रा, घरकुल योजनांमध्ये झालेले गोंधळ, डिजिटल योजनेचा उडालेला बोजवारा आणि पीकविम्यासाठी होणारी शेतकऱ्यांची ससेहोलपट असे भाजपविरोधी सगळे मुद्दे शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना पोहोचवले आहेत.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे चित्र रंगविण्यासाठी ५२ हजार ५०० विद्यार्थ्यांना शहरातील क्रीडा संकुलावर एकत्रित करण्यात आले. यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्याचा उपक्रमही आखला आहे. छोटय़ा उपक्रमातून संपर्क वाढवता यावा म्हणून महादेव मंदिरातून आता संपर्काची नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रावण महिन्यात सर्वसामान्यपणे बहुतेक जण एकदा का होईना महादेवाच्या मंदिरात जाऊन येतात. श्रावणी सोमवारी मोठी गर्दी असते.

वेरुळच्या घृष्णेश्वराला तर देशभरातून लोक येतात. या वेळी शिवसैनिक मंदिरात जाईल, महाआरतीत सहभागी होईल आणि तेथे दहाएक मिनिटासाठी संपर्क साधेल, अशी रचना करण्यात आली आहे. मतदान केंद्रापर्यंतचे कार्यकर्ते तयार करताना छोटय़ा उपक्रमातून संपर्काची ही मोहीम अधिक संदेश पोहोचविणारी असेल, असे जिल्हाप्रमुख दानवे म्हणाले.

हिंदुत्वाचा मुद्दा आपल्या हाती असावा, असा प्रयत्न शिवसेनेकडून पद्धतशीरपणे सुरू असताना येत्या काळात महादेव मंदिरातील महाआरत्यांच्या माध्यमातून सेना ‘हर हर महादेव’चा नारा बुलंद करणार आहे.

भगवा तर फडकवणारच

‘भगवा तर फडकवणारच’ असे एक अभियान गेला महिनाभर सुरू होते. प्रत्येक वॉर्डात आणि गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे आणि त्यात भाजपविरोधातील वातावरण पद्धतशीरपणे पेरून ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसांच्या गरजा आणि योजनांमधील तफावत सांगताना मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता बांधून ठेवण्यासाठी छोटे उपक्रम हाती घेण्यात आले. एका बाजूला आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत ग्रामीण भागात आणि शहरी भागातील महादेव मंदिरांमध्ये शिवसेनेकडून ‘महाआरत्या’ होणार आहेत.