उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; शिवजलक्रांती पॅटर्नचे ७८ गावांत लोकार्पण
परंडा, भूम आणि वाशी तालुक्यांतील ७८ गावांमध्ये ८५ किलोमीटर लांब जलसंधारणाची कामे करण्यात आली. शासकीय अनुदानाचा आधार न घेता बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती नावाने तयार केलेल्या नवीन पॅटर्नचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी परंडा तालुक्यातील भांडगाव येथे पार पडले. या शिवारात पाणी साचेल तेव्हा दुष्काळाने होरपळत असलेल्या जनतेच्या डोळय़ांत आनंदाश्रू तरळतील, असा आशावाद ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.
सावंत प्रतिष्ठानच्या वतीने नदी खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाची ७८ कामे पूर्ण करण्यात आली. या कामाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे व रवींद्र गायकवाड, लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, की भांडगाव परिसरातील शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या कामामुळे मोठा फायदा होणार आहे. शहरातील लोकांना दुष्काळ काय असतो, हे माहिती नसते. या भागात फिरल्यानंतर दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती आम्ही घरी बसून टीव्हीवर पाहतो. दुष्काळात या भागातील लोकांना, जनावरांना पिण्यास पाणी नाही. पाण्यासाठी कोसोदूर भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. लोकांना मदत करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक तानाजी सावंत यांनी, भूम, परंडा व वाशी तालुक्यांत केलेल्या कामांमुळे या भागात ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले. सीना-कोळेगाव प्रकल्पातील गाळउपसा केला जाणार आहे. हा गाळ शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी सरकारने डिझेल द्यावे, अशी मागणी सावंत यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केली. या मागणीच्या पूर्ततेसाठी डॉ. सावंत यांनी लगेच अनुमती दिली.