औंढा नागनाथ येथील मोर्चात कळमनुरीचे आमदार डॉ. संतोष टारफे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंगोलीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बांगर यांनी भाषणात आमदार टारफे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती.

शिवसेनेच्यावतीने दुष्काळ तालुका जाहीर करा या मागणीसाठी २९ नोव्हेंबरला औंढा नागनाथ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आंदोलकांना संबोधित करताना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्यावर जातीवाचक अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांचा अवमान केला होता. बांगर यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. बांगर यांनी राजकारणात खालची पातळी गाठल्याची टीकाही केली जात होती.

याप्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलिस प्रशासनाला संतोष बांगर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. अखेर मंगळवारी डॉक्टर संतोष टारफे यांनी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाऊन संतोष बांगर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. बांगर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीकलमाअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी दिली.