औरंगाबाद सिडको प्रशासनाने वाळूज परिसरातील अधिसूचित केलेली १८ पैकी ९ गावं सिडकोच्या अधिसूचीमधून वगळण्यात आली. भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचे सांगत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी बंब यांच्यामुळे नव्हे तर खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं, असं सांगत रांजणगाव ग्रामपंचायतमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात खैरे यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. यावेळी खुर्च्यांची तोडफोडही करण्यात आली.
अधिसूचीतून गावे वगळण्यासाठी खैरे यांनीच प्रयत्न केले होते, असे म्हणत, भाजप आमदार प्रशांत बंब यांचा सत्कार कार्यक्रमात खैरे समर्थकांनी धुडगूस घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

श्रेयवादाच्या मुद्यावर खैरे म्हणाले की, ‘स्थानिक कार्यकर्ते दळवी हा विषय घेऊन माझ्याकडे आले होते. मी पाठपुरावा करून विषय मार्गी लावला. मात्र, दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं श्रेय घेण्याच्या प्रयत्नात हा कार्यक्रम घेण्यात येत होता. त्याबद्दल विचारणा करण्यासाठी कार्यकर्ते गेले असता हा प्रकार घडला’
बंब यांनी या कृत्याचा निषेध नोंदवला आहे. बंब म्हणाले की, नऊ गावांसाठी मी कागदोपत्री लढा दिला आहे. त्यामुळेच त्यांना न्याय मिळाला. आमच्या कार्यकर्त्यांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. हा सरकारी कार्यक्रम नव्हता. खैरेंना जर श्रेयवादाचा दावा करायचा असेल, तर त्यांनी स्वत: कार्यक्रमाचे आयोजन करुन कागदोपत्री तसं सिद्ध करावं, जनतेला जे योग्य वाटेल ते जनता स्वीकारेल.  दरम्यान, या संदर्भात खैरे यांच्याशी संपर्क साधल्यावर, “तू काही बोलू नकोस, चूप बस, तुझ्या वयापेक्षा जास्त राजकारण मी केलं आहे. जे काही झालं ते योग्यच. जास्त काही बोलू नकोस”, असं उत्तर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या प्रतिनिधीला दिलं.