औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ११ मे रोजीच्या मध्यरात्री उसळलेला हिंसाचार पसरण्याला पोलीसच कारणीभूत असल्याचा आरोप करून शिवसेनेकडून गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी तसा थेट आरोप करून औरंगाबादच्या पोलिसांना राज्याच्या गृहखात्याकडून काही ‘सूचना’ मिळालेल्या असण्याची शंका उपस्थित केली. मुख्यमंत्र्यांकडील गृहखाते काढून ते रामदास कदम यांच्याकडे दिले तर ते चांगले सांभाळतील, असे सांगताना गृहमंत्रिपद शिवसेनेकडे सोपवण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. औरंगाबादला पोलीस आयुक्त द्यावा, अशी मागणी आता राज्याच्या गृहखात्याकडे नाही तर केंद्रीय गृहविभागाकडेच केली असल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले. पोलिसांकडून शिवसेनेची बदनामी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या कानी काही टाकायचे का, याबाबत आम्ही पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांना विचारले असता त्यांनीही मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याची गरज नाही, असे सांगितल्याचे खैरे म्हणाले. हिंसाचारप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विशेष समितीकडून करण्यात येणाऱ्या तपासावर विश्वास नसल्याचे सांगताना खासदार खैरे यांनी १९ मे रोजी औरंगाबाद पोलिसांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलेला असतानाही हा मोर्चा काढू, असेही खैरे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार बैठकीत सांगितले.

शहरात हिंसाचार घडला त्या वेळी औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे मुंबईत होते. ते हिमांशू रॉय यांच्या अंत्यविधीसाठी गेले होते हे समजू शकतो. पण तत्पूर्वीच दोन पोलीस उपायुक्त रजेवर जातात, आहेत, ते पोलीसही हिंसाचार घडत असलेल्या भागात उशिराने पोहोचतात. २६ जानेवारी दिवशी दंगा काबू पथक, बॉम्बशोधक पथक अशा वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांकडील शक्ती दाखवली जाते. मग त्या दिवशी कुठे गेले होते, मिटमिटा येथे कचराप्रश्नी उसळलेल्या दंगलीच्या वेळी १५० पोलीस अधिकारी, ७०० पोलीस कोठून आले, असाही प्रश्न खासदार खैरे यांनी उपस्थित केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम व समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी हिंसाचारग्रस्त भागात केलेली पाहणी म्हणजे मुस्लीम मतांसाठी भेटीगाठी करण्याचे राजकारण असल्याचे सांगताना खैरे यांनी विखे पाटील, हुसेन दलवाई या काँग्रेस नेत्यांवरही टीका केली. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी हिंसाचार हा रॉकेल व पत्ते क्लब चालवणाऱ्या माफियांनी घडवला असून पोलीस विभागातील गुन्हे शाखेत वेगळे राजकारण सुरू असून हिंसाचाराला तेही एक कारण असल्याचा आरोप केला. नवाबपुरा भाग हा जिन्सी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असतानाही पोलीस निरीक्षक हाश्मी यांनी कोणतीही कारवाई न करता दंगेखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप केला. घटनेच्या दिवशी तत्काळ प्रतिसाद पथक (क्यूआरटी पथक) कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला.

विनोद घोसाळकर यांनी हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित होती, पोलिसांनी ३५० वेळा गोळीबार केला असून जखमी केवळ तीन-चारच कसे दिसतात, असा प्रश्न उपस्थित केला. धनंजय मुंडे यांच्या नगरसेवकांच्या हप्त्यासाठी हिंसाचार घडवल्याचा आरोप, विखे यांचा खासदार चंद्रकांत खैरेंनी दंगल घडवल्याचा आरोप, दलवाई यांचे खैरेंविरोधात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याबाबतचे वक्तव्य, यावरही घोसाळकर यांनी टीका केली.