News Flash

पीक विमा आणि नुकसानभरपाईसाठी शिवसेनेचे मोर्चे

विविध मागण्यांचे निवेदन या वेळी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलसमोर आंदोलन

औरंगाबाद : एका बाजूला राज्य सरकारमध्ये जाण्याची इच्छा असणारी शिवसेना राजकीय पटावरील जुळवाजुळव घडवत असताना शेतकरी प्रश्नांवर अधिक संवेदनशील असल्याचा संदेश देण्यासाठी शिवसेना सोमवारी रस्त्यावर उतरली. मराठवाडय़ात ठिकठिकाणी आंदोलने केली.

औरंगाबादमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून जिल्हय़ातील सर्व तहसील कार्यालयावर तसेच विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन या वेळी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले.

पीकविमा कंपन्यांनी अवकाळी पावसामुळे ५० टक्कय़ांपेक्षा अधिक असल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई अग्रीम स्वरुपात देणे बंधनकारक आहे ती कार्यवाही विमा कंपन्यांनी करावी तसेच वाढीव मनुष्यबळ नेमावे अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असून त्यात वाढ करण्यात यावी, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना आमदार दानवे म्हणाले, ‘सरकार बनण्याची प्रक्रिया सुरू राहील. आम्ही शेतकऱ्यांच्यासमवेत आहोत. त्यांना मदत मिळावी यासाठी हे मोर्चे काढण्यात आले आहेत.’ मोर्चामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खरे यांच्यासह प्रमुख नेते व शिवसैनिक सहभागी झाले होते.

हेक्टरी २५ हजारांची मागणी

बीड- बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयावर मोच्रे, धरणे आंदोलन केले. बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर केज तहसीलसमोर जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मोर्चा काढून निदर्शने केली. इतर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली. धारुरमध्ये ढोल वाजवून शिवसनिकांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याची मागणी केली.

कर्जवसुली थांबवावी

जालना- जालन्यात माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ८१ हजार हेक्टर खरीप पिकांपैकी ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक पिके अतिवृष्टीने जालना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातामधून गेली आहेत. सोयाबीन, मका, कापूस, बाजरीसह फळबागांचे फार मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा

हिंगोली- हिंगोलीतील मोर्चादरम्यान जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली. रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे. महावितरणच्या थकित देयकाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे टाळावे.

बंद पडलेले रोहित्र तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावेत, अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उद्धव गायकवाड, भानुदास जाधव, परमेश्वर मांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:07 am

Web Title: shiv sena march for crop insurance and compensation zws 70
Next Stories
1 ‘धम्माचा अर्थ ग्रहण आणि पाचन प्रक्रियेत’
2 भारतीय विचारसरणीचे मूळ करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानात
3 परीक्षा कधी होणार!
Just Now!
X