आमदार शिरसाट व उपमहापौर जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा

औरंगाबाद : रस्त्यांच्या निविदा प्रकरणावरून शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांना शिवसेना आमदार संजय शिरसाट व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केलेल्या मारहाण प्रकरणात सोमवारी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्याच्या निविदा भरण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप खेडकर यांनी केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये असे प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकरणाची माहिती वर्तमानपत्रातून वाचली असून प्रकरण शिवसेनेचे असल्यामुळे तातडीने लक्ष घातले असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा देवळाई परिसरातील दोन कोटी रुपयांचे कंत्राट मिळावे म्हणून सुशील खेडकर यांनी निविदा भरली होती. ही निविदा त्यांनी मागे घ्यावी म्हणून आमदार संजय शिरसाट यांनी खेडकर यांना त्यांच्या संपर्क कार्यालयात बोलावले होते. या वेळी झालेल्या वादात संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ व त्यांच्या समर्थकांनी खेडकर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने आमदार शिरसाट यांची अडचण होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत असताना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली आहे.