30 September 2020

News Flash

ध्रुवीकरणाच्या वाटेवर युतीच्या आमदारांना चिंता

लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना अधिक मते मिळाली होती

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

लोकसभेतील पराभवानंतर विखुरलेली शिवसेना, दलित-मुस्लीम मतांमुळे जोमात असणारी वंचित बहुजन आघाडी, मराठा मतांचे झालेले ध्रुवीकरण यामुळे हबकून गेलेल्या आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले काय होणार, ही चिंता सतावू लागली आहे. विशेषत: चिंतेचे ढग शिवसेनेवर अधिक दाटून आले आहेत आणि भाजपचे आमदार ‘केंद्रात नरेंद्र – राज्यात देवेंद्र’ हा जुना नारा मोठय़ा आवाजात नव्याने आळवू लागले आहेत. वाट निसरडी आहे, कोण कधी घसरेल सांगता येत नाही, हे सर्वानाच जाणवू लागले आहे.जिल्ह्य़ात शिवसेनेचे तीन आमदार. पैठणचे संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट आणि कन्नडचे हर्षवर्धन जाधव. त्यातील जाधव यांनी सेनेशी फारकत घेतली. त्यांनी मराठा ध्रुवीकरण करत नवा पक्ष काढला. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख, ८३ हजार ७९८ मते मिळविली असली, तरी त्यांच्या कन्नड मतदारसंघातून मात्र त्यांना शिवसेना नेते चंद्रकांत खरे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उतरताना हर्षवर्धन जाधव यांनाही धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

अशीच स्थिती औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना अधिक मते मिळाली होती. दलित आणि मुस्लीम मतांची आघाडी तोडायची कशी, असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. संजय शिरसाट हे तुलनेने शिवसेनेतही फटकून वागतात. जाहीर कार्यक्रमांना हजेरी, एरवीचे नियोजन बाकी नेत्यांनी बघावे, अशी त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्यासमोर वेगळीच आव्हाने असणार आहेत. कधी पाय निसटेल हे सांगता येणार नाही, असे मदान तयार असल्याने मतदार जोडून ठेवा, तो एकगठ्ठा बांधून ठेवा. त्यातल्या त्यात भाजप नेत्यांशी जुळवून घ्यावे, अशी कसरत त्यांना करावी लागणार आहे. कारण अद्याप औरंगाबाद शहरातील तीनही मतदारसंघातील वंचित बहुजन किंवा एमआयएमचे संभाव्य उमेदवार कोण, हे अद्याप ठरलेले नाही. त्यातल्या त्यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना ध्रुवीकरणाचा किंवा वंचित आघाडीचा थेट फटका जाणवणार नाही. पण या मतदारसंघात एवढय़ा समस्या आहेत की, त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर नेहमी ऐकायला मिळतो. दुष्काळ, पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या मतदारांसमोर ते जातात कसे, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

नव्या समीकरणांची चिंताऔरंगाबाद जिल्ह्य़ातील भाजपच्या तीनपैकी दोन आमदारांनाही ‘कमळ’ फुलवता येईल का, असा प्रश्न विचारावा अशी आकडेवारी लोकसभा निवडणुकीतून समोर आली होती. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासमोर एमआयएमचे कडवे आव्हान असेल. या मतदारसंघातही एकगठ्ठा मतांची परंपरा निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वेळी या मतदारसंघातून काँग्रेसकडून राजेंद्र दर्डा यांनी नशीब आजमावले होते. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार किती मते घेईल, यावर बरीच गणिते ठरणार आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री सावे यांना मतांचा गठ्ठा एक व्हावा असे प्रयत्न करताना वंचित बहुजनच्या मतांमध्ये फूट पडेल, अशी रणनीती आखली तरच विजय मिळवता येईल. असेच ध्रुवीकरणाचे गणित गंगापूर मतदारसंघातही आहे. पण ते जातीचे आहे. एकवटलेला मराठा समाज प्रशांत बंब यांच्या पाठीशी या वेळी उभा राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. त्यांनी मतदारसंघातील कामे करण्यासाठी दोन वर्षांपासून खास कार्यकर्ते नेमले आहेत. एका स्वयंसेवी संस्थेमार्फत एमएसडब्लू झालेल्या तरुणांकडून त्यांनी गावातील प्रत्येकाची माहिती मिळविली आहे. त्यांच्या गरजाही त्यांना माहीत आहेत, पण जातीच्या मतांचे एकत्रीकरण कधी होईल, हे सांगता येत नसल्याने त्यांना ‘कमळ’ फुलविण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.

राज्यातील आमदारांनी आमदार बंब यांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मतदारसंघाबाहेरील नाराजीही अन्य कोणाला तरी बळ देणारी ठरू शकेल. मात्र जलयुक्त शिवार योजनेतून वापरलेला सीएसआर फंड त्यांना लाभकारक ठरणार की ध्रुवीकरणाचे उणेपण त्यांच्या वाटेला येणार हे प्रशांत बंब यांनाही सांगता येणार नाही.

हरिभाऊ बागडे  यांना विधानसभा अध्यक्षपद दिल्याने त्यांचा पक्षाने सन्मान केल्याची भावना सर्वत्र होती. सरळमार्गी माणूस अशी त्यांची प्रतिमा असली तरी भाजपच्या नियमाप्रमाणे त्यांचे वय झाले आहे. वयाचा निकष लागला नाही तर मैदानात उतरणाऱ्या हरिभाऊंसमोर काँग्रेसच्या कल्याण काळे यांचे तगडे आव्हान असणार आहे. चांगला जनसंपर्क आणि पक्षाची बाजू नीटपणे मांडू शकणारा काँग्रेसचा खरा कार्यकर्ता, अशी काळे यांची ओळख. त्यामुळे नव्या पटावर नवा डाव मांडताना हरिभाऊ बागडे यांनाही बरेच काही करावे लागणार आहे.

खासदार म्हणून निवडून आलेले इम्तियाज जलील यांनी आता एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली असल्याने राज्यातील निर्णय घेण्यात ते स्वतंत्र असतील. पण अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाशिवाय विजय मिळणार नाही हे जाणून असल्याने सारी गणिते ते नव्याने मांडू लागले आहेत. पण सेना असो भाजप किंवा एमआयएम या पक्षांसाठी ध्रुवीकरण हे हत्यारही असेल आणि निसरडेही.  बदलत्या नव्या गणितांमुळे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा त्याग केला. त्यांना भाजपमध्ये जायचे होते. पण अद्याप त्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. तो देऊ नका, असा सिल्लोडच्या स्थानिकांचा आग्रह आहे. ते आता पक्ष शोधत आहेत. त्यामुळे त्यांच्या चिंताही वाढलेल्या आहेत. पण मोठय़ा आवाजात बोलत आपले म्हणणे खरे करण्यासाठी वाट्टेल ते करू शकणारे आमदार सत्तार हे अगदी बिनघोर आहेत, असे म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी तशी औरंगाबाद जिल्ह्य़ात कुपोषित. नव्याने जुळलेल्या राजकीय गणितात राष्ट्रवादीला फारशी राजकीय जागाच उरली नाही. वैजापूरमधून निवडून आलेले भाऊसाहेब चिकटगावकर यांना मतदारसंघ राखणे शक्य होईल का, हे त्यांच्या समर्थकांनाही नीटसे सांगता येत नाही. त्यामुळे सारे आमदार एक निसरडय़ा वाटेवर स्वत:चा तोल सांभाळताना दिसत आहेत.

औरंगाबाद जिल्हा असे आहे पक्षीय बलाबल

* औरंगाबाद पूर्व- भाजप

* औरंगाबाद मध्य- एमआयएम

* औरंगाबाद पश्चिम – शिवसेना

* गंगापूर- भाजप

* वैजापूर- राष्ट्रवादी

* पैठण- शिवसेना

* फुलंब्री- भाजप

* कन्नड- शिवसेना

* सिल्लोड- काँग्रेस

आम्ही तर आमचे तीन कायम ठेवू. पण त्यात वाढ करू. साधारण पाच जागा शिवसेनेच्या वाटय़ाला याव्यात, अशी मागणी आहे. लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगळी असतात. त्यामुळे वंचित बहुजनचा किंवा एमआयएमचा कोणताही प्रभाव दिसणार नाही.

– अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना

कोणत्या जागा लढवायच्या हे अद्याप ठरलेले नाही. पण आमची ताकद वाढती आहे. २८ जुलै रोजी अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर औरंगाबादला येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होतील. पण आमच्यामुळे सर्व पक्षांमध्ये धाकधूक आहे.

– इम्तियाज जलील, खासदार औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2019 1:54 am

Web Title: shiv sena mla worry over upcoming assembly election result zws 70
Next Stories
1 मराठा क्रांतीच्या नावावर निवडणूक लढवण्यास विरोध
2 ‘जय श्रीराम’ प्रकरणाला औरंगाबादमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाकडून हवा?
3 फूड डिलिव्हरीतील तरुण भीतीच्या सावटाखाली
Just Now!
X