औरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने खासदार चंद्रकांत खैरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी धुळवडीच्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून भाजप-सेनेत सुंदोपसुंदी सुरू आहे. नेत्यांनी जरी मनोमिलन केल्याचे जाहीर केले असले, तरी या कार्यक्रमानंतर भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले.

या पाश्र्वभूमीवर रंगोत्सवाच्या निमित्ताने खासदार खैरे यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या.

महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, बसवराज मंगरुळे यांची खासदार खैरे यांनी आवर्जून भेट घेतली. औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल, असे सांगितले जात होते. मात्र, ही शक्यता आता फेटाळली जात आहे. जागांच्या अदलाबदलीत उस्मानाबाद आणि अमरावती या दोन्ही जागांवरील उमेदवार ठरले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळेल किंवा उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा झाली आहे.

परिणामी आता जागेची अदलाबदल होणार नाही. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार आणि खासदार खैरे अशी लढत होईल. काँग्रेसचे उमेदवार कोण, हे अद्याप ठरलेले नाही.

पक्षातून इच्छुक उमेदवारांपैकी प्रत्येक जण माझ्याऐवजी दुसऱ्यालाच उमेदवारी द्यावी, असे सांगत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने आमदार सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसच्या नेत्यांना कळविले होते. मात्र, उमेदवारीबाबतचा कोणताही निर्णय आज घेण्यात आला नाही.

दरम्यान, काही नेते अन्य पक्षातील नेत्यांना काँग्रेसमध्ये आणता येईल का, याचीही चाचपणी करत आहेत. काँग्रेसचा उमेदवार ठरला नसला, तरी खासदार खैरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू केले आहे. त्याच्या कलश पूजनाला आणि स्तंभपूजनाला भाजप नेत्यांनी फाटा मारला होता. या पाश्र्वभूमीवर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी खासदार खैरे यांनी घेतल्या.