स्पर्धेचे जग आहे. त्यामध्ये टिकायचं असेल ?, तर मराठी सोबत इंग्रजी सुद्धा उत्तम असणं गरजेचं आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. तिच्यावर प्रेम करा. मात्र इंग्रजीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी वृत्तपत्रासोबत दररोज इंग्रजी वर्तमानपत्र देखील वाचा. असा सल्ला शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरातील पाटीदार भवन इथे शिवसेनेच्या वतीने ‘शिव भरारी’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात खैरे बोलते होते.

रोजगार मेळाव्यात नोकरीसाठी आलेल्या मुलांना खैरे यांनी ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चा धडा दिला. मुलाखतीला जाताना काय काळजी घ्यावी याची माहिती सांगितली. सध्या असलेल्या स्पर्धेची जाणीव करून देताना, दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शंभर टक्के गुण मिळवलेले शंभर विद्यार्थी मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच कोणतही काम असले तरी संकोच न करता झपाटून काम करायला हवे, असा मंत्र दिला.

कुशल-अकुशल सेवा, व्यवस्थापन आणि हाऊस किपिंग, तसेच सॉफ्टवेअर आणि सपोर्ट इंजिनियर, सेल्स, मार्केटिंग, कस्टम केअर, मशीन ऑपरेटर, टेक्निशियन्स अशा विविध कामाची या रोजगार मेळाव्यातून संधी उपलब्ध करून देण्यात आली असून ३० कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला असल्याचं आयोजकाकडून सांगण्यात आले