जयंत पाटील यांची भूमिका

औरंगाबाद : महापालिकेमध्ये पूर्वी ११ जागा निवडून आल्या होत्या. आता मात्र त्या जागा कमी आहेत. याचा अर्थ पक्षाची अधोगती सुरू आहे. ती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मात्र, या वेळी निवडणुकीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी केली जाईल. त्यामुळे ज्या जागा वाटय़ाला येतील, त्या पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत असली तरी औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यश मिळाले नाही. दोन विधानसभा मतदारसंघात यश येईल, असे अपेक्षित होते. तसे घडले नाही. काही नेत्यांच्या चुका होत्या तर काही स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या चुका होत्या. येत्या काही दिवसांत प्रयेक मतदारसंघात पुनर्बाधणीसाठी पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल, असे जयंत पाटील यांनी आज सांगितले.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन काम करायला हवे, असे सांगत जयंत पाटील यांनी भाजपवरही टीका केली. शहरातील कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तीन वर्षे तो भाजपला सोडविता आला नाही. मोठी आश्वासने द्यायची आणि ती पाळायचीच नाहीत, असे भाजपने केले. त्यामुळे शहराच्या समस्या सोडविण्यासाठी शहराच्या स्तरावर एक समिती नेमण्याची सूचनाही जयंत पाटील यांनी शहराध्यक्ष विजयकुमार साळवे यांना केली.

शहरात आलेली माणसे ग्रामीण भागातून आलेली असल्याने त्या मतदारसंघातील नेत्यांनीही शहरात लक्ष घालावे असा समन्वय घडवावा, असेही पाटील म्हणाले. या वेळी आमदार विक्रम काळे, कैलास पाटील चिकटगावकर यांची भाषणे झाली. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी या वेळी मोठी गर्दी केली होती.

भाषणादरम्यान घोषणाबाजी

जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवनातील सभागृहात घोषणा देत आले. ‘एक मराठा- लाख मराठा’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. या कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करूनही ते थांबले नाहीत. त्यामुळे त्या घोषणांकडे जयंत पाटील यांनी दुर्लक्ष करत भाषण सुरू ठेवले. वारंवार आवाहन करूनही घोषणाबाजी होतच राहिल्याने जयंत पाटील यांच्या भाषणात व्यत्यय येत होता.