कर्जमाफीसाठी शिवसेनेने सरकारला झुकवले, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर कोणतेही भाष्य करण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टाळले. कर्जमाफीचे सर्व श्रेय शेतकऱ्यांचे आहे. कर्जमाफीची मागणी सर्व राजकीय पक्षांनी केली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही समावेश होता, असे म्हणत शिवसेनेला श्रेय देण्याचे दानवे यांनी टाळले. औरंगाबाद येथे ते पत्रकार बैठकीत बोलत होते.

शेतकरी संपानंतर त्यांनी केलेल्या मागण्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत ३४ हजार २०० कोटी रुपयांची सर्वात मोठी कर्जमाफी दिली. त्याचा लाभ ८९ लाख शेतकऱ्यांना झाला आहे, असे ते म्हणाले. वास्तविक कर्जमाफीच्या घोषणेचा अजून शासन निर्णयही निघालेला नाही. तो लवकरच निघेल, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच दौरा केला. दोन ठिकाणी घेतलेल्या मेळाव्यांमध्ये भाजप नेत्यांची कर्जमाफीविषयक मानसिकता सांगण्यासाठी एकनाथ खडसे, वेंकय्या नायडू आणि दानवे यांच्या ‘साले’ वक्तव्याचा आधार ठाकरे यांनी घेतला होता.  शिवसेना असा उल्लेख जरी झाला तरी त्या प्रश्नाचे उत्तर न देता रावसाहेब दानवे पुढचा प्रश्न विचारा, असे म्हणत होते. कर्जमाफीच्या याद्या जाहीर कराव्यात, अशी मागणी सेनेकडून करण्यात आली होती. त्यावर, या याद्या बँका जाहीर करतील एवढेच ते म्हणाले.

तो तुमचा प्रश्न आहे

चालू बाकीदारांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी उर्वरित कर्जाची रक्कम एकमुश्त बँकेत भरणे आवश्यक आहे, अशी अट टाकण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी उरलेले पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा दानवे म्हणाले, ‘तो तुमचा प्रश्न आहे. दीड लाखाचा लाभ घ्यायचा असेल तर उर्वरित रक्कम भरावी लागेल’, असे त्यांनी सांगितले.