विरोधी पक्षात असताना ‘देता की जाता’ ही मोहीम राबवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणारी शिवसेना आता मित्रपक्षांच्या विरोधातही मोहीम राबविणार आहे. शेतकऱ्यांच्या  कर्ज माफीसाठी शिवसेना ‘मी कर्जमुक्त’ होणारच या मोहीमेच्या तयारीला लागली आहे. औरंगाबादेत उद्धव ठाकरेंनी याबाबत माहिती दिली. शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क’ अभियानाला मराठवाड्यातून सुरुवात करण्यात आली. या अभियानाच्यामाध्यमातून शिवसेनेने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील प्रश्न जाणून घेतले. शिवाय संघटनात्मक बांधणीचे काम ही केलं. मराठवाडा शिवसंपर्क अभियानानंतर त्यांनी आज औरंगाबामधील सर्व आढावा घेतला. यावेळी शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही असल्याचे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना आम्ही त्यासाठी वेळही दिला होता. मात्र, फायदा झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना ‘मी कर्जमुक्त होणारच’ ही मोहीम राबवणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याचा अंत पाहू नका. शेतकऱ्याचा अंत म्हणजे सर्वांचा अंत आहे. असा सल्ला ही मित्रपक्षाला दिला.

समृद्धी महामार्गाच्या मुद्यावर उद्धव म्हणाले की, स्वप्न मोठं आहे. मात्र सत्यानाश करून विकास नको आहे. मी सत्तेला चिटकून बसलेलो नाही. मात्र, बऱ्याच काळानंतर सत्तांतर झालं आहे. त्यामुळे सरकारकडून अपेक्षा आहेत. मुंबई ते नागपूरदरम्यानचा प्रस्तावित समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरत असताना,  शिवसेना या महामार्गात स्वतची ‘आडवाट’ पुढे करेल, अशी चिन्हे यापूर्वी दिसली होती. ‘आम्ही सरकारमध्ये असलो तरी या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ देणार नाही’, असा इशारा शिवसेने दिला होता. याची पुन्हा एकदा आठवण करुन देत  ठाकरे प्रकल्पापेक्षा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे संकेत दिले.